आपला जिल्हा

‘अवगुणांवर विजय मिळवा; आत्मशक्ती जागवा’

दसरा महोत्सवात श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांचे आशिर्वचन

माजलगाव : नवरात्रोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नसून शक्ती, भक्ती, संयम, साहस आणि सद्गुणांची साधना आहे. माणसाने बाह्य शत्रूंवर विजय मिळविण्यापेक्षा दररोज स्वतःमधील वाईट सवयी आणि अवगुणांशी संघर्ष करून त्यांच्यावर विजय मिळविला पाहिजे. जीवनातील कोणत्याही यशासाठी स्वतःमधील अवगुणांचा त्याग आणि सद्गुणांचा स्वीकार आवश्यक आहे, असा मौलिक संदेश सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी दिला.

सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थान, माजलगाव येथे दसरा महोत्सवानिमित्त मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ८ वाजता मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी समाजबांधवांना आशिर्वचनपर मार्गदर्शन केले. नवरात्रोत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व, माता पार्वतीची विविध शक्तिस्वरूपे, प्रभू श्रीरामांचा रावणावरील विजय तसेच पांडवांनी शमीवृक्षावर लपविलेल्या शस्त्रांची कथा सांगत त्यांनी विजयादशमीचा व्यापक जीवनसंदेश उलगडून सांगितला. नवरात्र म्हणजे शक्ती, भक्ती आणि सद्गुणांची साधना असल्याचे सांगून श्रीगुरूंनी नऊ दिवसांच्या उपासनेचा अर्थ स्पष्ट केला. नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून माणसाने आपल्या अंतर्मनातील नकारात्मकतेवर मात करून सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करावा. शक्तीची उपासना करताना मनातील दुर्बलता दूर करून जीवनात संयम, साहस, श्रद्धा आणि सद्गुण रुजविणे आवश्यक आहे, असे श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी सांगितले.

नवरात्रोत्सवात पूजली जाणारी नवदुर्गेची विविध रूपे ही आदिशक्ती माता पार्वतीच्या विविध शक्तिस्वरूपांशी जोडलेली आहेत. पार्वतीचे सौम्य रूप मातृत्व, प्रेम, करुणा आणि ममतेचे प्रतीक आहे; तर दुर्गा आणि काली यांसारखी रूपे अन्याय व अधर्माचा नाश करणाऱ्या शक्तीचे प्रतीक आहेत. भक्तीमध्ये श्रद्धा, जीवनात संयम, संकटात धैर्य आणि कुटुंबात प्रेम असेल तर कोणतेही आव्हान पेलण्याची शक्ती माणसात निर्माण होते, असा संदेश श्रीगुरूंनी दिला. विजयादशमी अर्थात दसरा हा सत्य, धर्म आणि विजयाचा उत्सव आहे. रामायण परंपरेनुसार प्रभू श्रीरामांनी लंकेचा राजा रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय प्रस्थापित केला. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी रावणदहन करण्याची परंपरा रूढ झाली. मात्र रावणदहनाचा खरा अर्थ बाह्य पुतळ्याचे दहन करण्यापेक्षा मनातील अहंकार, क्रोध, लोभ, मोह, मत्सर यांसारख्या अवगुणांचे दहन करणे हा आहे, असे श्रीगुरूंनी स्पष्ट केले. महाभारताच्या विराट पर्वातील कथेनुसार, अज्ञातवासात जाण्यापूर्वी पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती. अज्ञातवास पूर्ण झाल्यानंतर अर्जुनाने शमीवृक्षावरून ती शस्त्रे परत घेतली. या परंपरेच्या स्मरणार्थ विजयादशमीला शमीपूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. शमी हे विजय, सामर्थ्य आणि संकटांवर मात करण्याचे प्रतीक मानले जाते, असेही श्रीगुरूंनी सांगितले.

‘दररोज स्वतःसोबत युद्ध करा’

विजयादशमीचा सर्वात मोठा संदेश म्हणजे स्वतःमधील अवगुणांवर विजय मिळविणे, असे सांगताना श्रीगुरू म्हणाले की, माणसाने दररोज स्वतःसोबत संघर्ष केला पाहिजे. वाईट सवयी, नकारात्मक विचार, अहंकार, मत्सर आणि इतर अवगुण सोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्याला स्वतःमधील अवगुणांवर विजय मिळविता येतो, त्याला जीवनातील कोणतेही यश प्राप्त करणे शक्य होते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

समाजबांधवांच्या घराघरांत जाण्याची श्रीगुरूंची संपर्क मोहिम

यावेळी श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी वीरशैव लिंगायत समाजातील सर्व समाजबांधवांना एकत्र आणून परस्पर संपर्क आणि सामाजिक ऐक्य वाढविण्यावर भर देणार असल्याची घोषणा केली. मठाच्या उत्कर्षासाठी आणि प्रगतीसाठी समाजातील प्रत्येक घटकाशी थेट संवाद साधण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. येत्या दिवाळी पाडव्यापासून या विशेष संपर्क मोहिमेला सुरूवात होणार असून, श्रीगुरू दररोज सकाळी तीन तास आणि सायंकाळी तीन तास समाजबांधवांच्या घरी सदिच्छा भेटी देणार आहेत. या मोहिमेची सुरूवात माजलगाव शहरातून होणार असून, समाजातील सर्व घटकांशी संवाद साधून त्यांना मठाशी अधिक घट्ट जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मठाचा उत्कर्ष हा केवळ एका व्यक्तीचा किंवा संस्थेचा विषय नसून, तो संपूर्ण समाजाच्या एकजुटीशी जोडलेला आहे. समाजातील प्रत्येक कुटुंबाशी संवाद, आपुलकी आणि परस्पर सहकार्य वाढवून मठाच्या प्रगतीला नवी दिशा देण्याचा श्रीगुरूंचा संकल्प या दसरा महोत्सवाच्या निमित्ताने अधोरेखित झाला.

माजलगाव : दसऱ्यानिमित्त सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानच्या वतीने श्रीगुरूंचा पारंपरिक पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात व उत्साहात पार पडला. या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत श्रीगुरूंचे दर्शन घेतले. पालखी मिरवणुकीदरम्यान भक्तिमय जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

Comment here