वैशाली पाटील अॅक्शनमोडमध्ये; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विभागांना ठोकले टाळे
माजलगाव : माजलगावच्या तहसीलदार वैशाली पाटील या अॅक्शन मोडमध्ये आल्या असून लेट लतिफ कर्मचाऱ्यांना इंगा दाखविला आहे. दरम्यान, सोमवार दि.२२ फेब्रुवारी रोजी सकाळी पाऊणे दहा वाजता स्वतः तहसीलदार पाटील यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्टिंग ऑपरेशन करून १० वाजता ज्या-ज्या विभागातील कर्मचारी उशिरा आले, त्या-त्या विभागाला टाळे ठोकले. या कारवाईमुळे कामचुकारांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
टाळे ठोकल्याने वऱ्हांड्यात प्रतिक्षेत असलेले कर्मचारी.
तहसीलदार वैशाली पाटील या कामचुकारांना धडा शिकविण्यासाठी चक्क ९ वाजता तहसील परिसरात आल्या. तहसील कर्मचाऱ्यांनी साधारणतः सकाळी पाऊणे दहा कार्यालयात हजर राहणे अपेक्षित असते, मात्र या वेळेत महसूल विभाग, पुरवठा विभाग, संगणक विभाग, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना विभाग आदी विभागात अधिकारी, कर्मचारी गैरहजर जाणवले, यावर तहसीलदार पाटील यांनी तातडीने प्रत्येक विभागाला टाळे ठोकले. काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या. उशिरा येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना टाळ्यावर आणण्यासाठी दर सोमवारी ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती तहसीलदार वैशाली पाटील यांनी ‘वर्तमान’शी बोलताना दिली.
Comment here