नरेशसिंह ठाकूर
बीड जिल्ह्यातील छत्रबोरगाव येथील भीमराव शिंदे हा बालक आधार लिंकमुळे त्याच्या आई-वडीलांना मिळाला. कित्येक वर्षे निराधार जीवन जगणाऱ्या भीमरावची चित्रपटात शोभेल अशी कहाणी त्याचा पाठपुरावा करणारे नरेशसिंह ठाकूर यांच्या शब्दांत ‘वर्तमान’च्या वाचकांसाठी देत आहोत.
“सर, या हनुमानचे आधार कार्ड काही निघत नाही बघा..! मी शाळेत जाऊन सांगते की, याला बिना आधार कार्ड चे बसवा. “नळदुर्ग येथील ‘आपले घर’ च्या गृहमाता काहीशा रागातच बोलल्या. त्यांच्या हाता मध्ये आधार कार्ड नोंदणी अयशस्वी झाल्याची पावती होती. हनुमान तेंव्हा ६ वी च्या वर्गात शिकत होता. मी त्या गृह मातेला म्हणालो की, ” शांत व्हा, आपल्याला नेमकी काय अडचण येत आहे व का? याचा अभ्यास करावा लागेल”. मी हनुमानाची केस फाईल हातात घेतली आणि एक एक कागद बारकाईने पाहण्यास सुरुवात केली.
२०१६ मध्ये हनुमान परभणी जिल्ह्यातील मानवत रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांना एकटा फिरताना सापडला होता. त्यांनी केस फाईल मध्ये लिहिलेल्या तपशील प्रमाणे त्याला आपलं नाव काय? आपण कुठे राहतो? कुठून आलो हे सांगता आले नाही. तो एवढंच म्हणाला की ” माझी आजी मला इथे सोडून गेली ती तुळजापूर ला राहते. मानवत रेल्वे पोलिसांनी त्याला परभणी बालकल्याण समिती कडे सोपवले. मुलाने सांगितलेल्या माहितीच्या आधारे तो तुळजापूर येथील असेल असा अंदाज लाऊन त्यांनी त्या मुलाला उस्मानाबाद बाल कल्याण समिती कडे सोपवले आणि मग त्याचा प्रवेश ‘राष्ट्र सेवा दल संचलित आपले घर बालगृह, नळदुर्ग’ या ठिकाणी झाला. त्याला ‘हनुमान’ असे नाव एका गृह मातेने दिले. २०१६ ते २०२० हे चार वर्ष हनुमान च्या पालकांचा शोध सुरू होता. ‘ आपले घर ‘ व बाल कल्याण समिती उस्मानाबाद यांच्या मार्फत अनेक वेळा वेग वेगळ्या समुपदेशकांच्या मार्फत हनुमान चे समुपदेशन करण्यात आले. परंतु त्याला काहीच आठवत नव्हते. ‘ आपले घर ‘ चे कर्मचारी त्याला अनेकदा तुळजापूर ला वेग वेगळ्या भागात घेऊन गेले, खूप चौकशी केली पण काही तपास लागत नव्हता. अभ्यासात हनुमान खूप हुशार निघाला. त्याने इयत्ता ५ वी ची स्कॉलरशिप परीक्षा देखील दिली होती. औरंगाबाद येथील एक निवृत्त शिक्षिका आपले घर येथे राहत होत्या त्यांचे हनुमान च्या अभ्यासाकडे विशेष लक्ष होते.
दि.२५ नोव्हेंबर २०१९ मी केस फाईल वाचून बंद केली. सगळा तपशील वाचल्यानंतर माझ्या लक्षात आले की, हनुमान चे पालक शोधण्यासाठी खूप मेहनत घेण्यात आली परंतु त्याचे आधार कार्ड का निघत नव्हते याच्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. मी युनिक आयडेंन्टीफिकेशन आॅथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर ईमेलद्वारे ही सर्व माहिती पाठवली. सोबत आधार कार्ड नोंदणी अयशस्वी झाल्याची पावती पाठवली. काही दिवसांनी त्यांचे उत्तर मिळाले. आम्ही ज्याचे हनुमान घाडगे नावाने आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचे मूळ नाव भिमराव मच्छिंद्र शिंदे आहे, त्याचे आधार कार्ड २०१३ सालीच काढले आहे व तो माजलगाव तालुक्यातील रहिवाशी असल्याचे समजले. उत्तर पाहून माझा आनंद गगनात मावेना. परंतु त्याचा नेमका पत्ता मिळेना. त्यासाठी हनुमानचे आधार कार्ड मिळवणे आवश्यक होते.
आम्ही आता युआयडीएआयच्या मुंबई येथील कार्यालयात जाण्याचे ठरवले. सदर माहिती मी बालकल्याण समिती उस्मानाबाद येथील अधिकाऱ्यांना व संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक पन्नालाल सुराणा यांना कळवली. आदरणीय पन्नालाल भाऊ यांनी मला ४ डिसेंबर २०१९ ला मुंबई येथे हनुमान ला घेऊन येण्यास सांगितले. रेल्वे चे आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु मिळाले नाही. मग सोलापूरहून रात्रीच्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसने मी आणि हनुमान मुंबईच्या दिशेने निघालो. जनरल डब्यात जिथे सामान ठेवतात त्या फळीवर बसून आम्ही दोघांनी कसा बसा प्रवास केला. रेल्वेत मी रात्रभर जागा होतो. हनुमान ला त्याच घर मिळणार या आनंदात मला झोप आली नाही. पहाटे ५ वा. वेळेचे पक्के असणारे ८७ वर्षीय पन्नालाल भाऊ आमची दादर रेल्वे स्थानकावर आमची वाट पहात थांबले होते. दादर ला उतरल्यावर आम्ही भाऊंचे परिचित श्री सुधीर देसाई यांच्या घरी गेलो. त्यांनी आमच्या साठी वाहनाची व्यवस्था केली व शुभेच्छा दिल्या. बरंच फिरल्यानंतर कुलाबा येथील एमटीएनएल बिल्डिंगमध्ये युआयडीएआयचे कार्यालय सापडले. तेथील अधिकाऱ्यांना सर्व माहिती दिली. त्यांनी हनुमानाच्या बोटाच्या ठसाच्या आधारे पडताळणी केली. परंतु नियमाप्रमाणे केवळ आधार नंबर दिला व असे सांगितले की या आधारकार्ड ला नव्याने मोबाईल नंबर लिंक करा व तेंव्हाच तुम्हाला मूळ आधार कार्ड मिळवता येईल. आम्ही मुंबईहून परतलो लगेच मी दुसऱ्या दिवशी हनुमान ला घेऊन तुळजापूर येथील एका आधार केंद्रावर गेलो आणि नव्याने मोबाईल नंबर लिंक केला.
दिनांक २७ फेब्रुवारी २०२० रोजी मोबाईल नंबर यशस्विरीत्या लिंक झाल्याचे समजले व आम्ही हनुमानचे मूळ आधार कार्ड डाऊनलोड केले. समोर माहिती आली. भिमराव मच्छिंद्र शिंदे, छत्रबोरगाव, ता.माजलगाव, जि.बीड. एक क्षणाचाही विलंब न करता मी माजलगाव च्या राष्ट्र सेवा दल च्या कार्यकर्त्या अॅड.सुलभाताई देशमुख यांना फोन करून सर्व माहिती दिली. त्यांनी ताबडतोब स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हनुमानच्या पालकांचा शोध घेतला. दिनांक २७ फेब्रुवारी २०२० च्या रात्री हनुमानचे वडील व त्यांच्यासोबत माजलगाव येथील पत्रकार मंडळी श्री.भगीरथ तोडकरी, श्री सुहास सावंत, श्री.सुनिल चौरे इत्यादी लोक पोहोचले. चार वर्षांमध्ये सर्व काही विसरून जाणाऱ्या हनुमान ने एका क्षणात आपल्या वडिलांना ओळखले व धावत जाऊन तो आपल्या वडिलांना बिलगला समोरचा देखावा निश्चितच सर्वांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आणणारा होता. दुसऱ्या दिवशी बालकल्याण समिती उस्मानाबाद यांच्या परवानगीने हनुमानला त्याच्या पालकांकडे रितसर सोपवण्यात आले. या घटनेला २८ फेब्रुवारी २०२१ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. माझ्या मनात मागे वळून पाहिल्यानंतर प्रश्न येतो की खरंच असे अजून किती हनुमान आहेत? जे ज्ञात-अज्ञात पणे घरातून निघून गेले व आजही दारोदर फिरत आहेत किंवा बालकाश्रमात आहेत परंतु त्यांच्या पालकांचा शोध अद्याप लागलेला नाही. मला खरोखरच हनुमानच्या पालकांचे कौतुक वाटते की त्यांनी वेळेवर हनुमानचे आधार कार्ड काढलेले होते व त्यामुळेच त्याची ओळख पटवण्यात यश आले व त्याला सुखरूप पणे त्याच्या घरापर्यंत आम्हाला पोहोचवता आले. मी या मध्ये सर्व श्रेय खरोखरच हनुमानच्या पालकांना देईल अशाच पद्धतीने अनेक पालकांच्या शोधात असलेल्या मुलांना ‘आपले घर’ मिळावे हीच सदिच्छा.
Comment here