आमदार प्रकाश सोळंके यांचा विधानसभेत सवाल; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातील महाघोटाळा
मुंबई : भाजपा सरकारच्या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षात महाघोटाळा झालेला असून अधिकृत संकेतस्थळावर आणि प्रत्यक्ष केलेला दावा या आकडेवारीवरीत मोठी तफावत आहे, त्यामुळे ते १००० कोटी गेले कुठे? असा थेट सवाल विधानसभेत माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी बुधवारी उपस्थित केला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी आमदार सोळंके यांनी लावून धरली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी समारोप झाला. यावेळी विधानसभेत चर्चेच्या वेळी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षात सन ऑक्टोबर २०१५ ते मार्च २०१९ या कालावधीत निधी वाटपात मोठा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. तत्कालीन कक्षप्रमुखांनी १५०० कोटी रूपये २१ लाख रूग्णांवर खर्च केले असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात मात्र अधिकृत संकेतस्थळाच्या दाव्यानुसार ५४ हजार रूग्णांवर 526 कोटी रूपये खर्च झाल्याचे नमूद आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षात महाघोटाळा झाल्याचे दिसून येते, यातील गंभीर बाब म्हणजे मृत व्यक्तींच्या नावेही निधी उचलला असल्याच्या तक्रारी राज्यभरातून आलेल्या आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षात त्यावेळी दलाल आणि एजंटांची साखळी राज्यभर निर्माण झाली होती. काही खाजगी हाॅस्पीटलशी संधान साधून अपात्र रूग्णांच्या नावेही गैरव्यवहार केलेल्या असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आमदार प्रकाश सोळंके यांनी विधानसभेत केली आहे.
‘सिंचन महामंडळ उभारण्याची गरज’
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प सर्वांचे हीत साधणारा आहे. आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे. मात्र सरकारने किडनीच्या आजारावर डायलिसिस सेंटरची सुविधा तालुकास्तरावर उभारावी अशी मागणीही आमदार प्रकाश सोळंके यांनी विधानसभेत केली. मराठवाड्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी प्रसंगी बाहेरून पाणी वळविण्याची गरज आहे. त्यासाठी वेगळे सिंचन महामंडळ तयार करावे असेही आमदार प्रकाश सोळंके म्हणाले.
Comment here