भगीरथ तोडकरी
माजलगाव : कोरोना वैश्विक महामारीच्या दुसर्या लाटेचा सामना सर्वजण करत असताना शासकीय ग्रामीण रूग्णालय मात्र 24 तास तत्पर राहून सेवा देत आहे. शासनाचे एक पाऊल पुढे म्हटल्याप्रमाणे अग्रेसर राहून माजलगावचे शासकीय ग्रामीण रूग्णालय रूग्णांना सेवा देत आहे.
गेल्या 22 मार्च 2020 पासून 4 एप्रिल 2021 पर्यंत शासकीय रूग्णालयाने 16135 जणांच्या अॅन्टीजेन टेस्ट केल्या आहेत. तर आरटीपीसीआर तपासण्या झालेल्या आहेत. माजलगाव तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.मधुकर घुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 1787 रूग्ण कोविडमुक्त झाले आहेत. तर सध्या 159 रूग्ण उपचार घेत आहेत. एकूण कोरोनाबाधितांची संख्या तालुक्यात 1992 वर गेली आहे. तर 46 जणांचा मृत्यू झाला आहे. शासन कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याला जनतेने सुध्दा मोठा प्रतिसाद देण्याची गरज आहे. जनतेमध्ये जनजागृती होत असली तरी कोरोना लढा ही माझी जबाबदारी आहे, हे ओळखणे गरजेचे आहे, असेही ‘वर्तमान’शी बोलताना डाॅ.घुबडे म्हणाले. माजलगाव ग्रामीण रूग्णालयात चार तज्ज्ञ डॉक्टर्सची टीम सक्रीय कार्यरत आहे. त्यात वैद्यकीय अधीक्षक डाॅ.सुरेश साबळे (जनरल सर्जन), डाॅ.गजानन रूद्रवार (छाती विकार तज्ज्ञ), डाॅ.प्रसाद कुलकर्णी (बालरोग तज्ज्ञ), डाॅ.प्रविण वारकरी (पॅथॉलॉजिस्ट) आदींचा समावेश होतो. रूग्णसेवेत काही अडचणी येऊ नयेत यासाठी शासकीय ग्रामीण रूग्णालयातील स्टाफ 24 तास तत्पर आहे. त्यासाठी 7 शिष्टर कार्यरत आहेत. अधिकारी, कर्मचारी असे मिळून एकूण 72 जणांचा स्टाफ, 1 रूग्णवाहिका त्याशिवाय 108 क्रमांक डायल करून उपलब्ध होणारी अत्याधुनिक रूग्णवाहिकाही आहेत.
आत्तापर्यंत 5791 जणांना लस
गेल्या 25 जानेवारीपासून माजलगाव ग्रामीण रूग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. 4 एप्रिलपर्यंत 5791 जणांना लस देण्यात आली असल्याची माहिती स्टाफ नर्स एस.आर.पठाण यांनी दिली. लसीकरण मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असला तरी आणखी व्यापक जनजागृती होण्याची गरज असल्याचे पठाण म्हणाल्या. 45 वर्षांपुढील नागरिकांना ही लस देताना त्यांची ऑनलाईन नोंदणी केली जात आहे, अशी माहिती देण्यात आली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत रूग्ण संख्येत वाढ : डाॅ.श्रेयस देशपांडे
गेल्या वर्षीच्या तुलनेत कोरोनाचे संक्रमण समुहामध्ये गतीने वाढत आहे, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन डाॅ.श्रेयश देशपांडे यांनी वर्तमानशी बोलताना केले. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणा प्रभावीपणे काम करत असून खाजगी हाॅस्पीटल देखिल कोरोनाबाबत अतिशय दक्ष आहेत, अशी प्रतिक्रियाही डाॅ.देशपांडे यांनी दिली.
अधिक सतर्क राहण्याची गरज : डाॅ.यशवंत राजेभोसले
कोरोनाची दुसरी लाट गंभीरतेने घेण्याची गरज आहे. सध्याची चैन तुटली नाही तर परिस्थिती गंभीर स्वरूपाची होवू शकते. तरूण युवक रूग्णांची संख्या वाढत असल्याने प्रत्येकाने याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया डाॅ.यशवंत राजाभोसले यांनी वर्तमानशी बोलताना दिली. दरम्यान, कोरोनाचे लक्षणे आढळली तर डाॅक्टरांशी त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहनही डाॅ.राजेभोसले यांनी केले.
नियमांचे तंतोतंत पालन करा : डाॅ.महेश मालपाणी
सध्या कोरोनाची सुप्त लाट सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकाने अतिशय दक्ष राहून कोरोनाबाबत शासनाने दिलेले नियम तंतोतंत पाळले, तर आपण कोरोनाला हरवू शकतो, अशी प्रतिक्रिया डाॅ.महेश मालपाणी यांनी दिली. दरम्यान, कोरोनाबाबत व्यापक जनजागृती आणि सूचनांचे पालन करत जनतेने कोरोना लढ्यात प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे असे आवाहनही डाॅ.मालपाणी यांनी केले.
Comment here