आपला जिल्हा

सामाजिक क्षेत्रात शिवजन्मोत्सव समितीचे कार्य कौतुकास्पद

जगदिश साखरे यांचे गौरवोद्गार; १०८ जणांचे रक्तदान

माजलगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक उपक्रमांवर बंधने असली, तरी आपत्ती काळातील गरज ओळखून शिवजन्मोत्सव पालखी सोहळा समिती व सोशल मिडीयातील इन्स्टाग्राम या माध्यमावर असलेल्या लव माजलगाव, जीव माजलगाव यांच्या वतीने रक्तदानाचा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविण्यात आला. माजलगाव तालुक्‍यामधील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शिवजन्मोत्सव पालखी सोहळा समितीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार जगदिश साखरे यांनी काढले. ते शुक्रवारी दि.३० एप्रिल रोजी माँ वैष्णवी मंगल कार्यालयात झालेल्या रक्तदान शिबिरात बोलत होते. याप्रसंगी तब्बल १०८ जणांनी रक्तदान केले.


राज्यात कोरोना विषाणूने मोठे संकट उभे केल्याने त्या रूग्णांवर उपचारासाठी आॅक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार यासोबतच आता रूग्णांना रक्ताची कमरता भासू लागली आहे. बऱ्याच ठिकाणी याचा तुटवडा निर्माण झाल्याने रूग्णांची गैरसोय होऊन ते दगावत आहेत. याची उपलब्धता निर्माण करून खारीचा वाटा उचलण्यासाठी माजलगावातील शिवजन्मोत्सव पालखी सोहळा समिती व सोशल मिडीयातील इन्स्टाग्राम या माध्यमावर असलेल्या लव माजलगाव आणि जीव माजलगावच्या पेज चालवणाऱ्यांच्या माध्यमातून अनेक तरूणांना एकत्र करून दि.३० एप्रिल रोजी वैष्णवी मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ८० जणांनी नोंदणी केली होती, मात्र प्रत्यक्षात १०८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक सलोखा राखण्याचे काम केले. यात तरूणी, महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती. या शिबिरात शासनाने आखून दिलेल्या कोरोना नियमावलीचे तंतोतंत पालन करण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सचिन अंडील, केदार सावंत, राज ढालमारे, दीपक तोडकरी, महेश बोटवे, आदित्य धारक, चंद्रकांत गवळी, गणेश औटे, नारायण आबेगावकर, गोविंद देशमाने, तुकाराम कळसाईतकर आदींनी परिश्रम घेतले. या शिबिरात सहभाग घेणार्‍या रक्तदात्यास जनता सर्जिकल यांच्याकडून सॅनिटायजरची बाॅटल तर सई मेडीकल यांच्याकडून प्रत्येकाला मास्क देण्यात आले. तर पिण्याच्या पाण्याची सोय जगदंबा अॅक्वाकडून करण्यात आली. शिव छत्रपती सामाजिक प्रतिष्ठान संचलित बीड येथील जिवनदायी ब्लड बँकेने रक्त संकलन केले.

सेलेब्रिटींनी केले आवाहन

या रक्तदान शिबिरात सहभागी होण्यासाठी माजलगावकरांना सुप्रसिद्ध सिनेअभिनेते संदीप पाठक, ए.व्ही प्रोडक्शनचे विश्वजित पोटभरे, बाल कलाकार हर्षद नायबळ यांनी सोशल मिडिया व्हिडिओद्वारे आवाहन केले होते.

Comment here