माजलगावात ३० एप्रिल, १ मे रोजी रक्तदान शिबिरांचे आयोजन
माजलगाव : शिवजन्मोत्सव पालखी सोहळा समिती व सोशल मिडीयातील इन्स्टाग्राम या माध्यमावर असलेल्या लव माजलगाव यांच्या वतीने शुक्रवार दि.३० मे रोजी वैष्णवी मंगल कार्यालयात तर महाराष्ट्र दिनानिमित्त शनिवार दि.१ मे रोजी तहसिल कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित केले आहे, अशी माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे.
राज्यात कोरोना विषाणूने मोठे संकट उभे केल्याने त्या रूग्णांवर उपचारासाठी आॅक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार यासोबतच आता रूग्णांना रक्ताची कमरता भासू लागली आहे. बऱ्याच ठिकाणी याचा तुटवडा निर्माण झाल्याने रूग्णांची गैरसोय होऊन ते दगावत आहेत. याची उपलब्धता निर्माण करून खारीचा वाटा उचलण्यासाठी माजलगावातील शिवजन्मोत्सव पालखी सोहळा समिती व सोशल मिडीयातील इन्स्टाग्राम या माध्यमावर असलेल्या लव माजलगाव आणि जीव माजलगावच्या पेज चालवणाऱ्यांनी यांच्या माध्यमातून अनेक तरूणांना एकत्र करून ३० एप्रिल रोजी वैष्णवी मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तर याच पार्श्वभूमीवर तहसीलदार वैशाली पाटील यांच्या प्रेरणेने तलाठी संघटना व महसूल कर्मचारी संघटना यांच्या वतीने १ मे या महाराष्ट्र दिनानिमित्त तहसिल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० एप्रिल रोजी होणाऱ्या शिबिरात कोरोना नियमावलीचे पालन करून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सचिन अंडील, केदार सावंत, राज ढालमारे, दीपक तोडकरी आदींनी केले आहे. तर दि.१ मे रोजीच्या रक्तदान शिबिरात योग्य रक्तदाते तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांनी रक्तदान करावे असे आवाहन गणेश जवादे (महसूल सहाय्यक), महसूल कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक साबणे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष रुपचंद आभारे यांनी केले आहे.
Comment here