माजलगावसह ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत
माजलगाव : शिवसेनेचे नवनियुक्त बीड जिल्हाप्रमुख अप्पासाहेब कडाजीराव जाधव मुंबईहून माजलगाव शहरात दाखल होताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज चौक ते जाधव यांच्या देवकृपा निवासस्थानापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीला शिवसैनिकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशान्वये बीडचे नवे जिल्हाप्रमुख म्हणून अप्पासाहेब कडाजीराव जाधव यांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर मुंबईहून जाधव हे माजलगाव शहरात गुरूवारी दाखल होताच सर्वत्र त्यांचे जल्लोषात स्वागत झाली. विविध ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत आणि पेढे वाटून अप्पासाहेब जाधव यांच्या निवडीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. माजलगाव, वडवणी, धारूर, परळी, केज, अंबाजोगाई तालुक्यांमधून ज्येष्ठ शिवसैनिक आणि तरूण शिवसैनिकांनी रॅलीत हजेरी लावली. माजलगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातून रॅलीला प्रारंभ झाला. पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून जाधव यांच्या देवकृपा निवासस्थानी रॅलीचे विसर्जन करण्यात आले. रॅलीत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
पक्षप्रमुखांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही : अप्पासाहेब जाधव
शिवसेना बीड जिल्हाप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर बोलताना अप्पासाहेब जाधव म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्या विश्वासाला कदापीही तडा जाऊ देणार नाही. अशी ग्वाही देतानाच जीवाचे रान करून संघटनात्मक बांधणीवर भर देणार आहे. गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक ही संकल्पना जिल्ह्यात राबवताना रक्ताचे पाणी आणि हाडाचे काडं झाले तरी मागे हटणार नाही, असा विश्वासही उपस्थित शिवसैनिकांना अप्पासाहेब जाधव यांनी दिला.
Comment here