गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांची शिवसैनिकांना सूचना
माजलगाव : कोणत्याही परिस्थितीत माजलगाव नगरपालिकेवर आगामी काळात भगवा फडकवा अशा स्पष्ट सूचना राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी शिवसैनिकांना दिल्या. ते जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्या देवकृपा निवासस्थानी बोलत होते.
कोरोना संकटाच्या काळात जिल्ह्यातील शिवसेनेने केलेल्या कार्याचे कौतुकही राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी केले. जाधव कुटुंबियांची आस्थवाईकपणे विचारपूस केली. शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांचा परिचय मंत्री देसाई यांना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी करून दिला. यावेळी मंत्री शंभूराजे देसाई यांचा जाधव कुटुंबीय, पदाधिकारी, शिवसैनिकांनी सत्कार केला. याप्रसंगी कडाजीराव जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके, माजी उपनगराध्यक्ष तुकाराम येवले, नगरसेवक अशोक आळणे, दासू बादाडे पाटील, अमोल डाके, अतुल उगले, कल्याण मोहिते, दिनेश मोहिते, सुखदेव धुमाळ, महादेव वैराळे, शुभम डाके, विठ्ठल जाधव, मुंजाबा जाधव, कदम आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती. शंभूराजे देसाई हे शिवसेनेतील वजनदार नेते असल्यामुळे या भेटीला चांगलेच महत्त्व आले आहे.
येत्या माजलगाव नगरपालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवून सर्व शिवसैनिकांनी एकत्र येवून एक वज्रमूठ आवळून शहरातील वार्डा-वार्डात जावून जनतेला शिवसेना पक्षाचे महत्त्व आणि कार्य सांगा, घर तिथे शिवसैनिक तयार करा, अशा सूचनाही शिवसेनेचे नेते तथा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यासमवेत पदाधिकाऱ्यांना दिल्या. माजलगाव नगरपालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असा आदेशही मंत्री देसाई यांनी शिवसैनिकांना दिला.
गृहराज्यमंत्र्यांची जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्या निवासस्थानी भेट
राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी शनिवारी बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्या माजलगावच्या देवकृपा निवासस्थानी भेट दिली. शंभूराजे देसाई यांच्या भेटीदरम्यान बीड जिल्ह्यातील शिवसेना मजबूत करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव, पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांशी चर्चा केली. या भेटी वेळी बीड जिल्ह्यातील संघटन वाढीबरोबरच अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
Comment here