आपला जिल्हा

जमिनीचा मावेजा मिळेना

संगम येथील कोल्हे कुटुंबीय स्वातंत्र्यदिनी उपोषण करणार

माजलगाव : धारूर तालुक्यातील मौजे संगम येथील सर्व्हे क्रमांक १४१ मधील जमिनीचा मावेजा मिळत नसल्याने येथील कोल्हे कुटुंबीय मुलाबाळांसह १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव येथे आमरण उपोषणास बसणार आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयाला ११ ऑगस्ट रोजी देण्यात आले आहे.

मौजे संगम येथील बालासाहेब अंबादास कोल्हे, संगीता रामा कोल्हे, अंगद रामा कोल्हे, शशिकला दामू कोल्हे, दीपक दामू कोल्हे, लक्ष्मण दामू कोल्हे आणि उत्तम रंभाजी कोल्हे हे मुलाबाळांसह आमरण उपोषण करणार आहेत. उपविभागीय कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शासनाने मौजे संगम ता.धारूर येथील पाझर तलावासाठी सर्व्हे क्रमांक १४१ क्षेत्र २ हेक्टर ९० आर जमीन संपादन केली. त्या जमिनीचा वाढीव मावेजा मिळावा म्हणून कोल्हे कुटुंबीयांनी दावा दाखल केला होता. त्या दाव्याचा निकाल ८ फेब्रुवारी २०१७ रोजी लागला असून प्रति गुंठा २००० रूपये मावेजा रक्कम न्यायालयाने वाढवून दिली. मावेजा रक्कम संदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून २०१७ पाहून आजपर्यंत टोलवाटोलवीची उत्तरे मिळाली. उपविभागीय कार्यालयाने मावेजा संदर्भात अद्याप शासनाकडे निधी मागणीचा प्रस्ताव सादर केलेला नाही. त्यामुळे आम्ही संपूर्ण कुटुंबीय १५ ऑगस्ट रोजी उपोषणास बसणार असल्याचा इशारा बालासाहेब कोल्हे यांनी दिला आहे.

‘…प्रसंगी आत्महत्याही करू’

सदर जमीन संपादित झाल्याने आम्हाला उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्याने उदरनिर्वाहासह मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न बिकट झाला आहे. जर शासनाने मावेजा संदर्भात गंभीर विचार केला नाही तर प्रसंगी आत्महत्याही करू, असा इशाराही निवेदनात देण्यात आलेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी उपविभागीय अधिकारी माजलगाव यांची राहिल असा इशारा अंगद कोल्हे यांनी दिला आहे.

Comment here