भगीरथ तोडकरी
माजलगाव : जिल्ह्याच्या राजकारणात सोळंके घराण्याचे वेगळे अस्तित्व आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या सूनबाई पल्लवी विरेंद्र सोळंके या लवकरच राजकारणात सक्रिय होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त ‘वर्तमान’च्या हाती लागले आहे. दरम्यान, या वृत्ताला त्यांच्या समर्थकांमधून दुजोरा मिळत असल्याचे बोलले जात आहे.
बीड जिल्ह्याच्या राजकारणात सोळंके घराण्याचा मोठा दबदबा आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते सुंदरराव सोळंके यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होताना दिसत आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा लोकनेते सुंदरराव सोळंके यांचे सुपूत्र प्रकाश सोळंके हे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर प्रकाश सोळंके यांचे पुतणे जयसिंग सोळंके हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झालेले आहेत. आता आमदार प्रकाश सोळंके यांच्या सूनबाई पल्लवी विरेंद्र सोळंके या स्थानिक राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पल्लवी सोळंके यांचा गेल्या २३ ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील काही ठिकाणी मोठे फलक लावण्यात आले होते. या बाबतही राजकीय वर्तुळात चर्चेला सुरूवात झाली आहे. सोळंके घराण्याचे समर्थक अशोक राऊत यांनी शिंपेटाकळी येथे पल्लवी सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण केले. गेल्या काही महिन्यांपासून पल्लवी सोळंके यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्येही सहभाग घेतलेला आहे. माजलगाव तालुक्याच्या सहकार, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात सोळंके परिवाराने मोठे काम उभे केलेले आहे. किंबहुना याच कामाच्या जोरावर सोळंके घराणे राजकारणात तग धरून आहे. बीड जिल्हा परिषदेचे सभापती तथा युवा नेते जयसिंग सोळंके यांच्यानंतर पल्लवी सोळंके यांच्या रूपाने सोळंके घराण्यातील तिसरी पिढी सक्रिय होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त ‘वर्तमान’च्या हाती लागले आहे. याबाबत सोळंके घराण्याच्या निकटवर्तीयांकडून दुजोरा मिळत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था की विधानसभा?
पल्लवी विरेंद्र सोळंके या विधी शाखेतील उच्च विद्या विभूषित असून मितभाषी व मनमिळाऊ स्वभावाच्या आहेत. विविध महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. सोळंके या आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका की विधानसभा निवडणूक लढविणार याबाबत मात्र सर्वकाही गुलदस्त्यात आहे. मात्र माजलगाव नगरपालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या नगरपालिका निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Comment here