दोन दशकापासून महापूराशी सामना; ग्रामस्थांची प्रशासनाकडे याचना
माजलगाव : गेल्या दोन दशकापासून तालुक्यातील सांडस चिंचोलीकर महापूराशी सामना करत आहेत. दरवर्षी महापूर आला की, सांडस चिंचोलीला पाण्याचा वेढा पडतो. जीव मुठीत घेवून ग्रामस्थ जीवन जगत आहेत. शासन-प्रशासनाकडे पुनर्वसनाची मागणी केली असली तरी याकडे गांभीर्याने बघितले जात नाही, अशी माहिती सरपंच सुनिता कदम यांनी ‘वर्तमान’शी बोलताना दिली.
बीड व माजलगाव शहरासह आसपासच्या खेड्यापाड्यांची तहान भागवणारे माजलगावचे धरण, ४५४.००० दलघमी इतकी या प्रकल्पीय क्षमता असलेले जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण, या धरणाच्या पुढे १० ते १५ किलोमीटर अंतरावर सिंदफणा नदी पात्राच्या काठी सांडस चिंचोली हे गाव वसलेले आहे. या गावाची भौगोलिक स्थिती अगदी बेटासारखी असून सिंदफणा नदी गावाला वेढा घालून वाहते. दरवर्षी पाऊस आला की या गावचे ग्रामस्थ पूर येऊ नये म्हणून देव पाण्यात घालून बसतात. कारण पूर आला की गावातील लोकांना कितीही महत्वाचे काम असले तरी अडकून बसावे लागते. शिवाय कधी या पुराचे पाणी गावातही शिरेल व आपल्याला जलसमाधी मिळेल, अशी भीतीही या गावच्या ग्रामस्थांत आहे. साधारण तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला जोडणारा पुलही सद्या पाण्याखाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ना बाहेर जाता येते, ना कोणाला इकडे येता येते. त्यामुळे या गावाचा संपर्क पूर आला की तुटतो. यंदाही तीच परिस्थिती आहे. आतापर्यंत सांडस चिंचोली ग्रामपंचायतीने प्रशासनास निवेदन सादर करत वारंवार गावाचे पुनर्वसन करण्यासाठी निवेदन सादर केलेले आहे. परंतु, त्यावर कसलीही कार्यवाही होऊ शकलेली नाही. सरपंच सुनिता अशोक कदम, उपसरपंच कृष्णा लिंबुरे यांनी २२ सप्टेंबर रोजीच तहसीलदारांना निवेदन देत गावाच्या पुनर्वसनाविषयी मागणी केली. प्रशासनाने निर्णय नाही घेतला तर आम्हाला एखाद्या पावसाळ्यात जलसमाधी मिळेल, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करतात.
मायबाप सरकार लक्ष देईल काय? : बाबासाहेब कापसे
सातत्याने गेल्या महिन्यात अतिवृष्टी होत असून आता माजलगाव प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला आहे. प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असून सिंदफणा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढताच सांडस चिंचोली या गावाला बेटासारखे स्वरूप प्राप्त होते. सप्टेंबर महिन्यात तीनदा गावाला पाण्याचा वेढा पडला, तर त्यावेळी सलग चार दिवस एकही नागरिक घराबाहेर पडलेला नाही. त्यामुळे गावाचा संपर्कच तुटल्यासारखी परिस्थिती आहे. दरम्यान, सिंदफणा नदीला महापूर आल्यानंतर सांडस चिंचोली ग्रामस्थांच्या काळजाची धडधड अधिक वाढते. यात आमच्या प्रश्नाकडे मायबाप सरकार लक्ष देईल काय? असा सवाल ग्रामस्थ बाबासाहेब कापसे यांनी ‘वर्तमान’शी बोलताना विचारला.
Comment here