चाटगावच्या रस्त्याप्रश्नी ठोस आश्वासन; रास्ता रोको मागे
किल्लेधारूर : तालुक्यातील मौजे चाटगाव जोडरस्ता दुरूस्ती प्रश्नी भाजपा युवा नेते बालासाहेब केकान यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. शनिवारी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे यांच्या समक्ष युवा नेते बालासाहेब केकान यांना रस्त्याच्या कामाचे मंजुरी पत्र देवून ११ ऑक्टोबर रोजी पुकारलेले रास्ता रोको आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
बीड-परळी महामार्गालगत असलेल्या चाटगाव येथील जोडरस्त्याचे काम गेल्या दहा वर्षांपासून रखडलेले आहे. या प्रश्नी चाटगावचे उपसरपंच तथा भाजपा युवा नेते बालासाहेब केकान यांनी संबंधितांना वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत. येत्या ११ ऑक्टोबर रोजी बीड-परळी महामार्गावर शेकडो ग्रामस्थांना बरोबर घेवून रास्ता रोको करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या विभागाला निवेदनाद्वारे केकान यांनी दिला होता. त्यानुसार केकान कोणत्याही परिस्थितीत आपल्या आंदोलनावर ठाम होते. शुक्रवारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे यांच्या समक्ष आंदोलक बालासाहेब केकान यांच्याशी चर्चा केली. आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र त्यानंतरही केकान आपल्या आंदोलनावर ठाम होते. शनिवारी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या बीड कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिंद्रुड येथे धाव घेवून चाटगाव जोडरस्ताचे काम लवकरच सुरू करू अशी ग्वाही पत्रात देण्यात आलेली आहे. त्यानुसार बालासाहेब केकान यांनी ग्रामस्थांच्या सहमतीने आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.
‘वर्तमान’ने मांडली होती कैफियत
‘आपले वृत्तपत्र, आपला आवाज’ हे ब्रीद घेवून समाजाचे विविध प्रश्न शासन दरबारी ठामपणे मांडणाऱ्या आधुनिक विचारांचे वर्तमानने चाटगाव रस्ताची कैफियत सर्वप्रथम मांडली. दि.२८ सप्टेंबर रोजी ‘जिजांनी झुलवत ठेवले, दादांचे आश्वासन हवेत विरले’ या मथळ्याखाली ठळक वृत्त दिले होते. या वृत्तामुळे प्रशासन जागे झाले. ‘वर्तमान’ने घेतलेल्या सामाजिक भूमिकेमुळे प्रशासनाचे लक्ष वेधले लवकरच रस्त्याचे काम मार्गी लागेल. ‘वर्तमान’ने घेतलेल्या सडेतोड भूमिकेबद्दल बालासाहेब केकान आणि ग्रामस्थांनी संपादकांचे धन्यवाद मानले आहेत.
Comment here