जि.प.सदस्य चंद्रकांत शेजुळ यांचे आई तुळजाभवानी मातेकडे साकडे
माजलगाव : पात्रुड जिल्हा परिषदेचे सदस्य तथा तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ गेल्या १६ वर्षांपासून नवरात्र उत्सवानिमित्त आबेगाव ते तुळजापूर अशी पायी दिंडी काढतात. यंदा अतिवृष्टीच्या महासंकटात सापडलेल्या बळीराजाला पुन्हा नवे बळ दे, असे साकडे आई तुळजाभवानी मातेकडे घालणार असल्याची माहिती ‘वर्तमान’शी बोलताना चंद्रकांत शेजुळ यांनी दिली. ते शुक्रवारी तेलगाव (ता.धारूर) येथे पायी दिंडी दरम्यान बोलत होते.
राष्ट्रवादीचे युवा नेते असलेले चंद्रकांत शेजुळ तुळजाभवानी मातेचे निस्सीम भक्त आहेत. या अपार श्रध्देपोटी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट उभी राहीली. गेली १६ वर्ष मागील वर्षीचा अपवाद वगळता आबेगाव ते तुळजापूर ही पायी दिंडी अखंडीतपणे सुरू आहे. दरवर्षी पायी दिंडीतून प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. मनातील मनोकामना पूर्ण होतात, यावर माझा दृढविश्वास आहे. त्यामुळे भविष्यकाळातही दिडींचे आयोजन नेटाने केले जाईल, असेही चंद्रकांत शेजुळ म्हणाले. धकाधकीच्या जीवनात आज प्रत्येकाकडे धार्मिक कार्यासाठी वेळ कमी आहे. वर्षातील ३६० दिवस सार्वजनिक जीवनासाठी मात्र वर्षातील पाच दिवस आई तुळजाभवानी मातेच्या चरणी समर्पित करतो. मागील दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या आधी पायी दिंडीद्वारे तुळजापूरला जावून आई तुळजाभवानी माते चरणी प्रकाश सोळंके आमदार व्हावेत, असे साकडे घातले होते. तुळजाभवानी मातेने ही राजकीय मनोकामना पूर्ण केली. त्यामुळे नव्या उत्साहात आई तुळजाभवानी मातेकडे दरवर्षी साकडे घालून मनोकामना पूर्ण करत असतो, असेही शेजुळ म्हणाले.
‘ईडापिळा टळो; कोरोनाचे संकट पळो’
यंदा महाराष्ट्रासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने थैमान घातल्याने अतिवृष्टी झाली. पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. या संकटातून बळीराजाला उभारी देणासाठी बळ मिळो, जगावर घोंगावणारे कोरोनाचे संकट पळो, असे साकडे आई तुळजाभवानी मातेकडे घालणार असल्याची माहिती चंद्रकांत शेजुळ यांनी ‘वर्तमान’शी बोलताना दिली.
Comment here