‘मनकाॅट’च्या शुभारंभाप्रसंगी सभापती संभाजी शेजुळ यांचे आवाहन
माजलगाव : अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना धीराने तोंड देण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे, असे आवाहन माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शेजुळ यांनी केले. ते मनकाॅट जिनिंग या खाजगी कापूस खरेदी केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी शुक्रवारी बोलत होते.
याप्रसंगी माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अच्युतराव लाटे, संचालक प्रभाकरराव होके, सुहासराव सोळंके, पंचायत समितीचे माजी सभापती जयदत्त नरवडे, सचिव हरिभाऊ सवणे, रामेश्वर टवाणी, रामूशेठ चांडक यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना सभापती संभाजी शेजुळ यांनी मार्गदर्शन केले. मनकाॅट जिनिंग येथे खाजगी कापूस खरेदी केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी सभापती संभाजी शेजुळ म्हणाले, माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. बाजार समितीने आजपर्यंत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून आपल्या जीवनात प्रगती साधावी, असेही प्रतिपादन शेजुळ यांनी केले.
सात हजार दर दिल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंद
यंदा बीड जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या संकटात सापडलेला आहे. अशा परिस्थितीत खाजगी कापूस खरेदी केंद्राने प्रारंभी ७००१ रूपये क्विंटल दराने कापूस खरेदी सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी प्रत्येक घटकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी करताना शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव द्यावा, असे आवाहन ‘वर्तमान’शी बोलताना सभापती संभाजी शेजुळ यांनी केले.
Comment here