आपला जिल्हा

बळीराजाने उत्पन्न वाढीकडे लक्ष द्यावे : पंजाब डख

सुंदरराव सोळंके साखर कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ 

तेलगाव : माजलगाव मतदारसंघातील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याने नावलौकिक निर्माण केला आहे. परिसरातील या कारखान्यावर अवलंबून असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी तेलगाव येथे केले.

तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ या ३० व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ रविवार, दि.१७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे मार्गदर्शक तथा माजी मंत्री, आमदार प्रकाश सोळंके होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून हवामान अभ्यासक पंजाबराव डक, चेअरमन धैर्यशील सोळंके होते. यावेळी व्यासपीठार जिल्हा परिषदेचे सभापती जयसिंह सोळंके, मुंबई बाजार समिती सभापती अशोक डक, बाबुराव पोटभरे, माधव निर्मळ, सभापती कल्याण आबुज आदि उपस्थीत होते. यावेळी ह.भ.प.महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या शुभहस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकुन शुभारंभ करण्यात आला. पुढे बोलताना डख म्हणाले. गेल्या दीड-दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने देशभरातील सर्व कंपन्या, उद्योगधंदे आदी बंद होते. मात्र आपल्या बळीराजाचीच एकमेव कंपनी चालू होती. या दरम्यान शेतकऱ्यांनी दूध, अन्नधान्य, भाजी नागरीकांना पुरवण्याचे काम केले असे प्रतिपादन व्यक्त करुन शेतकऱ्यांनी ऊसाची एकरी क्षेत्र वाढवण्यापेक्षा उत्पन्न वाढीसाठी टनेज वाढवावे, असे आवाहन हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी उपस्थित ऊस उत्पादकांना केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पंजाबराव डक म्हणाले की, मी फक्त हवामानावरून अंदाज व्यक्त करत असतो. रविवारपासून हवामान कोरडे राहणार असून ३ नोव्हेंबर पासून राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे. भारत कृषीप्रधान देश असुन ८० टक्के लोक शेती करतात त्यात ५० टक्के शेतकरी जिरायती तर ३० टक्के शेतकरी बागायती शेती करतात तर उर्वरीत २० टक्के लोक नोकरी करतात असे सांगत ते पुढे म्हणाले की, १९९५ पर्यंत पावसाचे प्रमाण चांगले होते. परंतु नंतरच्या काळात औद्योगिक क्षेत्र वाढल्याने प्रदुषण वाढले याचा परिणाम निसर्गावर होऊन पावसाचे प्रमाण कमी झाले. मात्र गेल्या दोन-तीन वर्षात पावसाचे पुन्हा चांगले आगमन झाले असून भविष्यातही काही वर्षे हे प्रमाण चांगले राहणार आहे. पूर्वी ३८ ते ४० अंश असे तापमान असायचे मात्र गेल्या काही वर्षात हे तापमान ४५ अंशापेक्षा जास्त होत आहे. कारण पृथवीचे तापमान वाढत असल्यामुळे पाऊस पडत आहे. पृथ्वीचे तापमान नियंत्रणात ठेवणे गरजेचे असून यासाठी प्रत्येक व्यक्तीने किमान एकंतरी झाड लावावे. वृक्ष लागवडीमुळे तापमान नियंत्रणात येण्यास मदत होते असे सांगून ऊस उत्पादकांसाठी आगामी काळ चांगला असून शेतकऱ्यांनी ऊसाचे टनेज वाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन धैर्यशील सोळंके यांनी करून कारखान्याच्या आजपर्यंतच्या कामाचा आढावा घेवून चालु हंगाम हा मोठा हंगाम असून या हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस गाळप करण्यासाठी सर्व ऊस उत्पादक शेतकरी, तोड वाहतुक ठेकेदार यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास सर्व संचालक मंडळ, यांचेसह कारखान्याचे कार्यकारी संचालक महादेव घोरपडे, सर्व खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार संचालक प्रकाश शिंदे यांनी केले.

‘पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले’

आशिर्वादपर भाषणात ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर म्हणाले की, लोकनेते सुंदररावजी सोळंके यांनी लावलेले हे रोपटे प्रकाश सोळंके व धैर्यशील सोळंके यांनी मोठ्या कष्टाने वाढवत असून या कारखान्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावत असून त्यांची आर्थिकदृष्ट्या प्रगती होण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांनीही हा कारखाना आपलाच आहे हे समजून आमदार प्रकाश सोळंके आणि धैर्यशील सोळंके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले.

Comment here