आपला जिल्हा

रमेश आडसकरांचा माजलगावात मुक्काम वाढला

मोहन जगताप यांचा सल्ला भलताच घेतला मनावर 
माजलगाव : भारतीय जनता पार्टीचे नेते रमेश आडसकर यांनी माजलगाव विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढविला असून गेल्या काही दिवसांपासून त्यांचा माजलगाव मुक्कामही वाढला आहे. दरम्यान, एका कार्यक्रमात भाजपा नेते तथा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन जगताप यांनी रमेश आडसकर यांना उद्देशून माजलगावात 24 तास उपलब्ध असले पाहिजेत, असा उपरोधात्मक सल्ला दिला होता. मोहन जगताप यांनी दिलेला सल्ला आडसकरांनी भलताच मनावर घेतला असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत रमेश आडसकर यांनी भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढविली होती. माजलगाव विधानसभा मतदारसंघातील मातब्बर असलेल्या प्रकाश सोळंके यांच्याशी निवडणुकीत कडवी झुंज देवून नवखे असताना सुध्दा रमेश आडसकर यांनी चांगला प्रभाव दाखविला. त्यामुळे आडसकर समर्थकांमध्ये नवचैतन्य आहे. एकीकडे माजी आमदार आर.टी.देशमुख यांनी मतदारसंघात संपर्क वाढविला असून मोहन जगतापही भाजपचे सक्रिय कार्य करीत आहेत. तर नितीन नाईकनवरे हेही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सक्रिय झालेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर रमेश आडसकर यांनीही आपला आवाज व्यापक जनसंपर्क वाढविला आहे. समता काॅलणी परिसरात स्वतंत्र सदनिका घेवून आपले वास्तव्य सुरू केले आहे. मागील काही दिवसांमध्ये एका कार्यक्रमात आमदार प्रकाश सोळंके, रमेश आडसकर, बाबुराव पोटभरे, राजेसाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत राजकीय कलगीतुरा रंगला. यात मोहन जगताप यांनी आडसकरांना माजलगावात मुक्कामी रहायला हवे तर पक्ष संघटन वाढेल, असा सल्ला दिला. हा सल्ला आडसकरांनी भलताच मनावर घेतल्याचे दिसून येते. जगताप यांनी दिलेल्या सल्लानंतर आडसकरांना मुक्काम वाढला आहे हे अधोरेखित होते. भाजपातील एका कार्यकर्त्याला या बाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, माजलगाव मतदारसंघात रमेश आडसकर यांचा संपर्क सुरूवातीपासूनच आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घेवून व्यापक संघटन वाढविण्याचे काम रमेश आडसकर करत आहेत, असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Comment here