ह.भ.प.बाळु महाराज गिरगावकर यांचे विचार
माजलगाव : वारकरी संप्रदायाने माणसे जोडण्याचे काम केले आहे. संतांच्या महान विचारावर आधारलेल्या वारकरी संप्रदायाने सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली, असे आवाहन विचार प्रसिद्ध प्रबोधनकार ह.भ.प.बाळु महाराज गिरगावकर यांनी छत्रबोरगाव येथे मांडले.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने छत्रबोरगाव येथील श्री सिध्देश्वर मंदिरात आयोजित केलेल्या किर्तन सोहळ्यात ह.भ.प.बाळु महाराज गिरगावकर यांनी प्रबोधन केले. सोमवारी श्री सिध्देश्वर मंदिरात किर्तन सोहळा आणि महाप्रसादाचे आयोजन तुळजाभवानी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत शेजुळ यांनी केले होते.
किर्तन सोहळ्यात बोलताना ह.भ.प.बाळु महाराज गिरगावकर म्हणाले, संतांनी लोकप्रबोधनाच्या माध्यमातून सामाजाची जागृती केली. तोच वसा आज वारकरी संप्रदाय नेटाने पुढे नेत आहे. त्याच परंपरेचा पाईक म्हणून आम्ही संतांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम करत आहोत. अध्यात्मिक क्षेत्र महान आहे, ते जपण्याची गरज आहे. सर्व समाजाला एक छताखाली वारकरी संप्रदाय आणू शकतो. त्यामुळे सर्वधर्मसमभावाची बीजे वारकरी संप्रदायात दडलेली आहेत, असेही विचार गिरगावकर महाराज यांनी मांडले.
या किर्तन सोहळा आणि महाप्रसादाचा छत्रबोरगाव, आबेगाव, मरडसगाव आणि पंचक्रोशीतील भाविकभक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. या कार्यक्रमाला माजलगाव तालुक्यातील आणि परभणी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक चंद्रकांत शेजुळ यांनी ह.भ.प.बाळु महाराज गिरगावकर यांचा शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार केला.
‘सभामंडप उभारणीसाठी प्रयत्न करावेत’
समाजकारण आणि सहकार क्षेत्रात नावाजलेले चंद्रकांत शेजुळ राजकारणातही अव्वल काम करत आहेत. त्यांना याहीपेक्षा मोठा राजाश्रय मिळो, अशा शुभेच्छा ह.भ.प.बाळु महाराज गिरगावकर यांनी चंद्रकांत शेजुळ यांना दिल्या. छत्रबोरगावातील श्री सिध्देश्वर मंदीर अतिशय पुरातन काळातील आहे, त्याचा जिर्णोद्धार करण्याची जबाबदारी समाजातील दानशूर व्यक्तींवर आलेली आहे. त्यामुळे या मंदिराकडे चंद्रकांत शेजुळ यांनी लक्ष घालून भव्य सभामंडप बांधण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मागणी केली.
Comment here