महा-राष्ट्र

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे मंगेश चिवटे नवे प्रमुख

सीएम कार्यालयात ओएसडी पदावर नियुक्ती

मुंबई : पत्रकारिता आणि आरोग्य क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात उल्लेखनीय कार्य करणारे मंगेश चिवटे यांची मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून मंगेश चिवटे यांची निवड करण्यात आली आहे.

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष पुन्हा गजबजणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमाळ्याचे मंगेश चिवटे यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून गुरूवारी (२१ जुलै) नेमणूक केली आहे. सोमवारी (२५ जुलै) चिवटे कक्ष प्रमुखाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात हा कक्ष कार्यरत होता, मात्र अनेक जाचक अटींमुळे त्याचा लाभ मोठ्या संख्येने गरजूंना होऊ शकला नव्हता.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर १३ मार्च २०१५ रोजी या कक्षाची स्थापना झाली होती. सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) रकमेतून या कक्षातून मदत केली जात होते. द्रारिद्र्य रेषेखालच्या राज्यातील रूग्णांना या कक्षातून खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत मदत केली जात होती. ओमप्रकाश शेटे हे कक्षाचे प्रमुख होते. पहिल्या तीन वर्षांत या कक्षाने २८ हजार गरजू रूग्णांना ३०२ कोटींची मदत केली. तसेच ४५० धर्मादाय रूग्णालयांच्या १० टक्के राखीव खाटांमधून ६०० कोटींचे उपचार झाले होते. या कक्षावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कक्षात केवळ सरकारी अधिकारी नेमले. तसेच निवडक १० गंभीर आजारांसाठी मदत देण्याच्या अटी टाकल्या. परिणामी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष असूनही निरूपयोगी होता. तसेच येणाऱ्या अर्जांची संख्या घटली होती

महाराष्ट्राचा आरोग्यदूत कक्षप्रमुख

आरोग्य क्षेत्रात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून भरिव कार्य केलेले महाराष्ट्र तथा महाराष्ट्राचे आरोग्यदूत म्हणून सर्वदूर परिचित असलेले मंगेश चिवटे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर बांदा ते चंद्रपूरपर्यंत त्यांच्या नियुक्तीचे स्वागत झाले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची स्थापना झाली. या कक्षाची मूळ संकल्पना मंगेश चिवटे यांची आहे. त्याअनुषंगाने मंगेश चिवटे यांची नियुक्ती झाल्याने योग्यवेळी योग्य व्यक्तीचा यथोचित सन्मान झाला असल्याची प्रतिक्रिया संपूर्ण राज्याभरातून उमटत आहे. मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांचे विश्वासू आहेत.

Comment here