आमदार श्रीकांत भारतीय करणार उद्घाटन; प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचा होणार सत्कार
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या वतीने शनिवार, १२ ऑगस्ट 2023 रोजी छ्त्रपती संभाजीनगर येथे सोशल मीडिया प्रशिक्षण कार्यशाळा आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या सोशल मीडिया प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय हे करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे तर दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, दैनिक पुढारी, मराठवाडा आवृत्तीचे संपादक धनंजय लांबे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्र्वास अरोटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा होणार आहे.
संपूर्ण राज्यात सर्वाधिक सदस्य संख्या असलेला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा एकमेव आहे. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर रचनात्मक आणि संघर्षात्मक अशा दोन्ही पातळीवर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व्यापक लढा देत आहे. सोशल मीडियाचे वाढते प्रस्थ लक्षात घेता, पत्रकार संघातर्फे राज्य पातळीवरील पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यासाठी एकदिवसीय ‘सोशल मीडिया प्रशिक्षण कार्यशाळा’ आयोजित केली आहे. १२ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत ही कार्यशाळा आय.एम.ए.हॉल, शनी मंदिराजवळ, जिल्हा न्यायालयासमोर, अदालत रोड, समर्थ नगर, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली असून सोशल मीडियाचा वाढता वापर आणि प्रभाव, तंत्रज्ञान वापरण्याची पद्धत व उपयोगिता याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या
सामाजिक पत्रकारितेचा सन्मान
लोकमत माध्यम समुहाचा अतिशय प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय पातळीवरील “एक्सलन्स इन सोशल जर्नलिझम अवार्ड’ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना दुबईत प्रदान करण्यात आला. त्यानुषंगाने पत्रकार संघाच्या वतीने मुंडे यांचा गौरव करण्यात येणार आहे.
Comment here