‘एबीपी माझा’ कडून पत्रकारितेतील योगदानाचा गौरव
मुंबई : महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि आघाडीच्या ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीचा ‘महाराष्ट्राचे अनमोल रत्न’ हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
मुंबईतील कोर्टयार्ड मेरिट या पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवार, दि. ८ सप्टेंबर २०२३ रोजी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, एबीपी वृत्तवाहिनीचे कार्यकारी उपाध्यक्ष राजीव खांडेकर, प्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या मान्यवरांच्या हस्ते वसंत मुंडे यांना महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या शानदार सोहळ्याला राज्यभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज, मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई आणि Aeon play च्या माध्यमातून वृत्तपत्र आणि डिजिटल माध्यमात केलेल्या नाविन्यपूर्ण, भरीव योगदानाची दखल घेत महाराष्ट्रातील आघाडीच्या ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने ‘महाराष्ट्राचे अनमोल रत्न’ या पुरस्कारासाठी मुंडे यांची निवड करण्यात आली. ‘महाराष्ट्राचे अनमोल रत्न’ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुंडे यांचे संपूर्ण राज्यभरातून अभिनंदन होत आहे.
एबीपी माझाचा ‘अनमोल रत्न’ सन्मान माझ्यासाठी अभिमानास्पद : वसंत मुंडे
मराठी वृत्तवाहिन्यांच्या स्पर्धेतही ‘एबीपी माझा’ने आपले वेगळेपण जपले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून ही वृत्तवाहिनी काम करत आहे. या वाहिनीचे कार्यकारी उपाध्यक्ष राजीव खांडेकर यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली एबीपी माझा वाहिनीने आपला दबदबा निर्माण केला आहे. अशा प्रतिष्ठित वाहिनीने सन्मान केला, माझ्यासाठी ही अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
Comment here