१२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन चंद्रकांत शेजुळ यांची माहिती; सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचीही घोषणा
माजलगाव : सहकार क्षेत्रात मानबिंदू ठरलेल्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.माजलगाव संस्थेला १६ कोटी ४६ लाख रूपयांचा नफा झाला आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन चंद्रकांत शेजुळ यांनी रविवार, दि.२४ सप्टेंबर २०२३ रोजी दिली. ते संस्थेच्या १२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. दरम्यान, संस्थेच्या सभासदांना १० टक्के डिव्हीडंड अर्थात लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणाही चंद्रकांत शेजुळ यांनी केली.
माजलगाव येथील व्यंकटेश मंगल कार्यालयात २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेला प्रारंभ झाला. तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटच्या १२ व्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन चंद्रकांत शेजुळ होते. सभेच्या प्रारंभी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर दीपप्रज्वलन नागेबाबा मल्टीस्टेटचे संस्थापक तथा मल्टीस्टेट फेडरेशनचे प्रतिनिधी कडूभाऊ काळे यांच्या हस्ते आणि सर्व सन्माननीय संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले. या मंगल प्रसंगाची सुरूवात महाराष्ट्रगीत आणि मराठवाडा गीताने करण्यात आली. सर्व सभासदांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सभेत तुळजाभवानी अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शहाजी शेजुळ यांनी सभेसमोरील महत्त्वपूर्ण विषयांचे वाचन करून उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधले.
सहकार क्षेत्रात विशेषतः बँकींग प्रणालीमध्ये प्रचंड प्रमाणात बदल होत आहेत, आपण काळानुरूप भविष्याचा वेध घेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सभासदांना अचूक, गतीमान, सर्वोत्तम आणि सुरक्षित बँकींग सुविधा प्रदान करत आहोत. यासाठी संस्थेने आपला सर्व डेटा आरबीआय मानांकित अशा आधुनिक डेटा सेंटरला स्थलांतरीत केलेला असून आपले स्वतंत्र सर्व्हर कार्यान्वीत केले असल्याचेही माहिती चेअरमन चंद्रकांत शेजुळ यांनी दिली. यावेळी सभासदांनी अहवाल व ताळेबंदावर विचारलेल्या प्रश्नांना संस्थेचे चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समाधानकारक उत्तरे दिली. या सभेला संचालक सर्वश्री भारत रामराव होके, अभय रामराव पवार, सुशिल रामराव डक, नितीन मदनराव काळे, राजेश्वर राधाकिसन कुलथे, दिनेश पंडितराव बिराजदार, तुकाराम महादेव जगधने, सौ.वैशाली विजयसिंह सोळंके, सौ.शोभा मदनराव आंबोरे आदींची उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन पुरूषोत्तम जाधव, रामेश्वर मोरे यांनी तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर देशमुख यांनी मानले. वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी तुळजाभवानी अर्बनचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी पसायदानाने सभेची सांगता झाली.
तुळजाभवानी अर्बन संस्थेला ‘अ’ वर्ग दर्जा कायम
संस्थेचे चेअरमन चंद्रकांत शेजुळ यांनी वार्षिक ताळेबंदाचा आढावा घेतला. पुढे बोलताना चंद्रकांत शेजुळ म्हणाले, २०१२ साली संस्थेची स्थापना करण्यात आली. आजमितीला संस्थेकडे सभासद आणि ग्राहकांची १,४४,०३० एवढी संख्या आहे. संस्थेचे भागभांडवल ९ कोटी ९५ लाख एवढे आहे. संस्थेकडे ५७७ कोटी ५६ लाख रूपये ठेवी आहेत. संस्थेने तब्बल ४३२ कोटी ७६ लाख रूपयांचे कर्ज ग्राहकांना दिले आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल १०१० कोटी ३३ लाख असून संस्थेचा निव्वळ नफा १६ कोटी ४६ लाख एवढा झाला आहे. संस्थेला ‘अ’ ऑडिट वर्ग मिळाला असल्याचेही माहिती शेजुळ यांनी दिली.
Comment here