आपला जिल्हा

ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या टेंबे गणपतीचे थाटात विसर्जन 

माजलगाव : नवसाला पावणारा टेंबे गणपती म्हणून ओळख असलेल्या टेंबे गणपतीची विसर्जन मिरवणुक उत्साहात काढण्यात आली. मिरवणूकीत दोन देखावे देखील सादर करण्यात आले.

नवसाला पावणाऱ्या टेंबे गणपतीचे विसर्जन मिरवणुक शनिवारी सायंकाळी ६ वाजता आकर्षक सजविलेल्या ट्रॅक्टरमधुन काढण्यात आली. १९०१ ला या गणपतीची स्थापना झाली होती परंतु समाजकंटकांनी ही मिरवणुक अडविली होती. यानंतर हैद्राबाद येथुन निजाम राजवटीमध्ये घोड्यावरून प्रवास करत गणपती स्थापनेची परवानगी ताम्रपटावर ब्रम्हवृंदांनी आणली होती. यामुळे या गणपतीची स्थापना उशिरा म्हणजेच एकादशीला झाली होती तेव्हापासून त्याच तिथीला गणेशाची स्थापना केली जाते.

१२३ वर्षांची परंपरा असलेल्या या टेंबे गणेश मंडळाने ईकोफ्रेंडली गणपती स्थापनेची परंपरा आजतागायत अविरतपणे सुरूच ठेवली आहे. मिरवणुक यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष अनंतशास्त्री जोशी, किशोर जोशी, डॉ.अक्षय जोशी, वैभव जोशी, सुरेंद्र जोशी, रविंद्र जोशी, अमित जोशी, गणेश मुळी, अनिल मुळी यांचेसह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. जोशी गल्लीमधुन निघालेली ही विसर्जन मिरवणुक हनुमान चौक मार्गे झेंडा चौक, पाटील गल्ली येथे नेण्यात आली होती. गजानन महाराजांचे विठ्ठलाच्या रूपात भक्त बापू काळेंना दिलेले दर्शन, हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतानाचे दोन्ही सजिव देखावे सादर केलेले आहेत तर ठिकठिकाणी महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या व टेंबे गणपतीची महिला भाविकांनी चौका चौकात आरती केली.

Comment here