पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते पुणे येथे होणार गौरव
बीड : लढा दुष्काळाशी फाऊंडेशनचे अध्यक्ष, सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष तथा बीड जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे वडवणी तालुक्यातील तिगावचे सरपंच अॅड.राज पाटील यांना यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण पुणे येथे होणार आहे.
यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्त आयोजित राजेश दिवटे लिखित डॉ.पांडुरंग वाटरकर यांच्या जीवनावर आधारित शेतकऱ्यांचा सेवक या प्रेरणादायी ग्रंथाचा भव्य प्रकाशन समारंभ, राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व कवी संमेलन या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित पद्मश्री पोपटराव पवार (आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्य), कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अनंत कदम, प्रमुख पाहुणे रामदास माने प्रसिद्ध सेवाभावी उद्योजक संजय अडसुळे संचालक मावळ वार्ता, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक राजेश दिवटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथील पत्रकार भवनात रविवार २९ आक्टोंबर रोजी सकाळी ११:०० वाजता हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. सरपंच अॅड.राज पाटील यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विविध सामाजिक, राजकीय व्यक्ती, संघटनेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.
अॅड.राज पाटील यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय
अॅड.राज पाटील यांनी मागील 20-22 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून दिलेले आहे. त्यांनी उतराई महोत्सवाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना रुग्णसेवा दिलेली आहे. वडवणी तालुका विकास समिती तसेच लढा दुष्काळाशी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी धावून येणारे नेते म्हणून त्यांनी बीड जिल्ह्यात किर्ती मिळवलेली आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या वडवणी तालुक्यातील १०५ शाळेतील बारा हजार शालेय विद्यार्थ्यांना त्यांनी शालेय साहित्य वाटप केले. एवढेच नाही तर कोरोणाच्या महामारीत त्यांनी गावोगावी जाऊन गरजवंतांना अन्नधान्य, कपडे, किराणा यासारखे साहित्य तसेच आरोग्य सेवा देखील पुरविण्याचे पवित्र कार्य केले. एमबीबीएसला लागलेल्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी वेळोवेळी आर्थिक पाठबळ दिले आहे. समाजासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या या लढवय्या नेत्याचा सन्मान पुणे येथील संस्थेने केल्यामुळे नक्कीच वडवणी तालुक्यासह बीड जिल्ह्यातील सर्व सामान्य लोकांना आनंद आहे.
Comment here