महा-राष्ट्र

महाराष्ट्रातील पतसंस्थांना फेडरेशन पाठबळ देणार

मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांची ग्वाही

माजलगाव : देशभरातील विशेषतः महाराष्ट्रातील मल्टीस्टेट, पतसंस्थांना सावरण्यासाठी आता मल्टीस्टेट, पतसंस्था फेडरेशन पुढे आली असून मल्टिस्टेट, पतसंस्थांसाठी अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधीच्या धर्तीवर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन को-ऑप सोसायटीची स्थापना करण्यात येणार असल्याचे मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे म्हणाले की, मल्टीस्टेट, पतसंस्था अडचणीत येणार नाही, यासाठी त्यांचे मागे आर्थिक बळ उभे करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. ॲसेट रिकन्स्ट्रक्शन को-ऑप सोसायटीची ही सहकारी तत्त्वावर स्थापन झालेली असून ॲसेट रिकन्स्ट्रक्शन को-ऑप सोसायटी कंपनीची संकल्पना देशभरातील राष्ट्रीयकृत सहकारी व खाजगी बँकांकरीता राबविण्यात येते. त्याच धर्तीवर ही संकल्पना सहकारी पतसंस्था व मल्टीस्टेट पतसंस्थांसाठी राबविण्यात येणार आहे. आजच्या पहिल्याच प्राथमिक बैठकीमध्ये या संस्थेसाठी १०० कोटी रुपयांचे भाग भांडवल जमा झाले आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे.

अधिक माहिती देताना गोदावरी मल्टीस्टेट अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील म्हणाल्या की, माझे पती खासदार हेमंतजी पाटील यांचे माध्यमातून या सोसायटीचे रजिस्ट्रेशन मी केंद्रीय निबंधकांकडून मंजूर करून आणून देईल यात सर्वांनी निश्चित असावे. अशा प्रकारची संस्था स्थापन करण्याची सूचना बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे चेअरमन राधेश्यामजी चांडक यांनी केली होती त्याला अनुसरूनच आजच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

मल्टीस्टेट पतसंस्थांच्या संपन्न झालेल्या बैठकीत सर्व मल्टीस्टेट पतसंस्थांसाठी आचारसंहिता देखील तयार करण्यात आलेली आहे. १) कोणतीही मल्टीस्टेट पतसंस्था ठेवींना १० टक्के पेक्षा जादा व्याजदर देणार नाही. २) सर्व पतसंस्था किमान २५ टक्के इतकी तरलता राखतील. तसेच १ टक्का रोख तरलता सुद्धा राखेल. त्याच प्रमाणे सर्व मल्टीस्टेट पतसंस्था एकमेकांमध्ये गुंतवणूक करण्याच्या ऐवजी मल्टीस्टेट शेड्युल को-ऑप. बँकांमध्ये गुंतवणूक करतील.अशा प्रकारचा निर्णय देखील आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

तसेच महाराष्ट्रात चुकीचे काम करणाऱ्या मल्टीस्टेट व पतसंस्थांना संरक्षण देणार नाही. परंतु चांगले काम करणाऱ्या मल्टीस्टेट व पतसंस्थांच्या मागे भक्कमपणे उभे राहणार असल्याचे मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.

ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन को-ऑप सोसायटी स्थापन करण्यासाठी धनंजय तांबेकर यांचे अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली असून ही समिती तातडीने या संस्थेचे उपविधी तयार करून केंद्रीय निबंधकांची भेट घेणार आहे. याबाबत अधिक बोलताना धनंजय तांबेकर म्हणाले की, आता केंद्रीय निबंधक यांनी मल्टिस्टेट पतसंस्थांसाठी कठोर निकष बनवलेले असल्याने मल्टिटेट पतसंस्थांचे भवितव्य यापुढे निश्चित उज्वल असणार आहे. मल्टीस्टेट पतसंस्थांवर लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढणार आहे यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडू काळे म्हणाले की, मल्टीस्टेट पतसंस्थांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी महाराष्ट्रात एका सहकार दिंडीचे देखील आयोजन करणार आहोत. या सहकार दिंडीचे माध्यमातून गावोगाव जाऊन सहकारी चळवळी वरील विश्वास वाढवण्याचे काम आम्ही करणार आहोत. बैठकीला उपस्थित सर्व मल्टिस्टेट पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या मालमत्ता, आपल्या घरातील सोने-नाणे हे सर्व तारण ठेवून आम्ही पैसा उपलब्ध करू. परंतु ठेवीदारांचे पैसे आम्ही बुडवणार नाही अशा प्रकारचे ग्वाही दिली.

Comment here