विशेष वार्ता

आक्रमक तेवढाच अभ्यासू नेता

आक्रमक तेवढाच अभ्यासू नेता

बाबा श्रीहरी देशमाने

Lदिल्लीच्या तख्यावर शेतकऱ्यांचा ‘मोदी विरोधी’ लढा अधिक तीव्र झाला असताना महाराष्ट्र काँग्रेस समितीचे अध्यक्षपद एका शेतकरी नेत्याकडे आले, याला निश्चित अर्थ आहे. अगदी अपेक्षितपणे नाना पटोले यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची धूरा आली. एक आक्रमक नेता म्हणून नाना पटोले यांची प्रतिमा आहे. काँग्रेसच्या अखिल भारतीय किसान आघाडीचेही नाना पटोले अध्यक्ष आहेत. केंद्रात मोदी विरोधी चेहरा, राज्यात ओबीसी नेता म्हणूनही काँग्रेसने त्यांच्याकडे राज्याची सूत्रे सोपविली आहेत.


सामान्य शेतकरी कुटूंबात जन्म घेतलेले नाना पटोले ‘संघर्षमय’ व्यक्तीमत्व आहे. शेतकऱ्यांचा ‘वाली’ म्हणून सत्तेची गणितं मांडतांना कधी नफ्या-तोट्याची पर्वा न करणारा निर्भीड नेता म्हणून पटोले यांची देशभर ख्याती आहे. भाजपचे खासदार असताना चक्क मोदींना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून खडेबोल सुनावणारे पटोले बंडखोर नेतृत्व आहे. भाजपात अल्पकाळ राहून बंडाची भाषा करणाऱ्या पटोलेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभा लढविली. राज्यात भाजपची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा निघाली. या यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी पटोलेंनी महापर्दाफाश यात्रा काढून भाजपची तारांबळ उडवून दिली होती. ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी, ही मागणी लावून धरणारे पटोले यांना काँग्रेसने मानाचे स्थान दिले आहे.

राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद आले. अल्पकाळ का होईना या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न पटोले यांनी केला आहे. आक्रमक शैलीचा हा अभ्यासू नेता विदर्भातील साकोली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहे. काँग्रेसला राज्यात नवसंजीवनी मिळवून देण्यासाठी नाना पटोले यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. काँग्रेस हायकमांडने प्रदेश कार्यकारिणीची पुनर्रचना करताना कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्षांची तगडी टीम स्थापन केली आहे. राज्यात काँग्रेसची ‘घडी’ नीट बसवताना पटोले यांच्यासमोर आव्हाने असतील मात्र ते लीलया पेलतील असे त्यांच्या आजवरच्या कार्यपध्दतीवरून लक्षात येते. तूर्त शेतकरीपुत्राला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा देऊया!

Comment here