अभिनेत्री केतकी नारायणची शाॅर्टफिल्म देशभर चर्चेत
Mमुंबई : प्रतिभावंत अभिनेत्री केतकी नारायणने कौटुंबिक हिंसाचारा संदर्भात तयार केलेली ‘बजी’ ही शाॅर्टफिल्म देशभर चर्चेचा विषय बनली आहे. केवळ दोन मिनिटांत गृहिणीचे भावविश्व समर्थपणे रेखाटून समाजमनाला एक वेगळा संदेश देण्याचे काम ‘बजी’ने केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाउनची स्थिती असली, तरी अनेक कलाकार स्वस्थ बसले नव्हते. केतकी नारायण ही अशीच एक वेगळेपण जपणारी कलाकार आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी काही दिवसांपूर्वी तिने ट्रॅव्हल व्हीलॉग सुरू केला. तिने स्वत: लेखन आणि दिग्दर्शन केलेली ‘बजी’ ही शॉर्ट फिल्म सध्या चांगलीच चर्चेत आहे. सतत घरगुती हिंसाचार सहन करावी लागणारी स्त्री आपलं स्वातंत्र्य हरवून बसलेली असते. पतीकडून होणारी मारहाण आणि त्याच्या जाचाला कंटाळलेली असताना लॉकडाउनमुळे तिचा पती बाहेर कुठेतरी अडकतो. त्याच्या अडकण्यामुळे तिला मात्र स्वातंत्र्य मिळते. अचानक मिळालेले हे स्वातंत्र्य ती कशी अनुभवते, त्या काळात काय करते हे सगळं ‘बजी’ या शॉर्ट फिल्ममधून पाहायला मिळते. ओनीर आणि संजय सूरी यांच्या अँटीक्लॉक फिल्म्स आयोजित फिल्म मेकिंग चॅलेंजमध्ये तिने ही शॉर्टफिल्म शॉर्ट फिल्म तयार केली आहे. निहार शेंबेकरने संगीत दिले असून याचं छायांकन नेविन झेवियरने केले आहे. लॉकडाउनचे सर्व नियम पाळूनच तिने ही शॉर्ट फिल्म तयार केली आहे. अंतिम फेरीसाठी या लघुपटाची निवड झाली असून, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी दिले जाणारे पारितोषिकसुद्धा तिला मिळाले. फिल्म मेकिंग चॅलेंजसाठी परीक्षक म्हणून नंदीता दास, रिमा दास, गुनीत मोंगा, भारद्वाज वंगन यांनी काम पाहिले. ‘बजी’चे चित्रपट जगतात स्वागत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
गृहिणी आणि लाॅकडाउनमधील तीचे भावविश्व केवळ दोन मिनिटांत मांडणे आव्हानात्मक काम आहे. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांचे जोडीदार लाॅकडाउनमध्ये इतर ठिकाणी अडकल्याने या कालावधीत तीने अनुभवलेले स्वातंत्र्य यावर भाष्य करण्याचे काम ‘बजी’ने केले आहे, बेस्ट अॅक्टरचा अवार्डही मला मिळाला. देशभर ‘बजी’ची चर्चा होतेय याचा मनस्वी आनंद वाटतो.
– केतकी नारायण
अभिनेत्री
Comment here