महा-राष्ट्र

ना वशिला, ना ओळख; थेट मिळते वैद्यकीय मदत : मंगेश चिवटे

गोरगरीब-गरजू रूग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष ठरला आशेचा किरण

मुंबई : राज्यातील गरीब आणि गरजू रूग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष वरदान ठरत आहे. गेल्या १ वर्ष ११ महिन्यांत ३२,००० पेक्षा अधिक गोरगरीब-गरजू रुग्णांना एकूण २६७ कोटी ५१ लक्ष रूपयांची वैद्यकीय मदत देण्याचा विक्रम शिंदे सरकारने केला आहे. दरम्यान, ना वशिला, ना ओळखीची आवश्यकता नसून वैद्यकीय मदतीसाठी रूग्ण आणि रूग्णांच्या नातेवाईकांनी थेट मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रूग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रूग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे. या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केले आहे. गोरगरीब-गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रूग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिले आहेत. यानुसार आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या १ वर्ष ११ महिन्यात ३२,००० पेक्षा अधिक गोरगरीब-गरजू रुग्णांना एकूण २६७ कोटी ५१ लक्ष रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.

श्री.एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश नरसिंह चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या कक्षाची जबाबदारी दिली होती. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याची ही गरज नाही पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस करून वैद्यकीय मदत मिळणार असल्याचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळविता येईल.

संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे. दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कक्षप्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी केले आहे.

Comment here