महा-राष्ट्र

महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते आमदार प्रकाश सोळंके यांचा गौरव

माजलगाव : राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे सन २०२०-२१ करिता महाराष्ट्र विधानसभा ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार मंगळवारी मुंबईच्या विधान भवनात एका शानदार सोहळ्यात माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांना महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे  महाराष्ट्र विधानमंडळाच्या  सदस्यांना सन २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३२०२३-२४ या कालावधीसाठी देण्यात येणाऱ्या ‘उत्कृष्ट संसदपटू’ व ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात दुपारी साडेतीन वाजता आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार वितरण सोहळ्यात महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार प्रकाश सोळंके यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार म्हणून गौरवपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधान सभेचे सभापती राहुल नार्वेकर, उपसभापती नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील आदींची उपस्थिती होती. दरम्यान, आमदार प्रकाश सोळंके यांना उत्कृष्ट भाषणाबद्दल चा पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे मतदार संघात सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

‘उत्कृष्ट भाषण पुरस्कार हा मतदारसंघातील जनतेचा पुरस्कार’

चौथ्यांदा आमदार म्हणून माजलगाव मतदारसंघातील जनतेने मला काम करण्याची संधी दिली, राज्याच्या सर्वोच्च सभागृहात पाठवले.आजचा पुरस्कार हा मतदारसंघातील जनतेचा पुरस्कार आहे. आमदार म्हणून सभागृहात लोकांच्या न्यायासाठी,लोकांच्या मूलभूत सुविधांसाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि विकास कामांसाठी बोलता आले. लक्षवेधीच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधून घेऊ शकलो. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि पाठबळामुळे हा पुरस्कार मिळाला अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली.

Comment here