संस्थेला तब्बल १८ कोटी ५२ लाख रूपयांचा नफा; चेअरमन चंद्रकांत शेजुळ यांनी दिली माहिती
: सभासदांना १० टक्के लाभांशही देणार
माजलगाव : सहकार क्षेत्रात मानबिंदू ठरलेल्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.माजलगाव संस्थेने यंदाही आपली गरूड झेप कायम ठेवली असून संस्थेला तब्बल १८ कोटी ५२ लाख रुपयांचा नफा झाला आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन चंद्रकांत शेजुळ यांनी रविवारी दिली. संस्थेच्या १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. दरम्यान, संस्थेच्या सभासदांना १० टक्के डिव्हीडंड अर्थात लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा चंद्रकांत शेजुळ यांनी केली.
माजलगाव येथील व्यंकटेश मंगल कार्यालयात रविवार, दि.२२ सप्टेंबर रोजी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी चेअरमन चंद्रकांत शेजुळ होते. सभेच्या प्रारंभी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर दीपप्रज्वलन बँकिंग तज्ज्ञ नितीन वाणी यांच्या हस्ते आणि सर्व सन्माननीय संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले. या मंगल प्रसंगाची सुरूवात महाराष्ट्रगीत आणि मराठवाडा गीताने करण्यात आली. याप्रसंगी सर्व सभासदांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सभेचे प्रास्ताविक उपाध्यक्ष ज्ञानेश्वर देशमुख यांनी केले तर तुळजाभवानी अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शहाजी शेजुळ यांनी सभेसमोरील महत्त्वपूर्ण विषयांचे बाचन करून उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधले.
या सभेला संचालक भारत रामराव होके, अभय रामराव पवार, सुशिल रामराव डक, नितीन मदनराव काळे, राजेश्वर राधाकिसन कुलथे, दिनेश पंडितराव बिराजदार, तुकाराम महादेव जगधने, वैशाली विजयसिंह सोळंके, शोभा मदनराव आंबोरे, भास्कर गवळी आदींची उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम जाधव, नारायण झोडगे यांनी तर आभार संस्थेचे विभागीय अधिकारी नवनाथ शिंगणे यांनी मानले. वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी तुळजाभवानी अर्बनचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी पसायदानाने सभेची सांगता झाली.
वार्षिक ताळेबंदाचा आढावा; संस्थेला ‘अ’ वर्ग दर्जा कायम
संस्थेचे चेअरमन चंद्रकांत शेजुळ यांनी वार्षिक ताळेबंदाचा आढावा घेतला. पुढे बोलताना चंद्रकांत शेजुळ म्हणाले, २०१२ साली संस्थेची स्थापना करण्यात आली. आजमितीला संस्थेकडे सभासद आणि ग्राहकांची १,४४,०३० एवढी संख्या आहे. संस्थेचे भागभांडवल ९ कोटी ९६ लाख एवढे आहे. संस्थेकडे ५९१ कोटी ६९ लाख रूपये ठेवी आहेत. संस्थेने तब्बल ३८३ कोटी रूपयांचे कर्ज ग्राहकांना दिले आहे. संस्थेचा निव्वळ नफा १८ कोटी ५२ लाख एवढा झाला आहे. संस्थेला ‘अ’ ऑडिट वर्ग मिळाला असल्याची माहिती शेजुळ यांनी दिली.
Comment here