माजलगाव : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त माजलगावात निघालेल्या अभूतपूर्व सहकार दिंडीने शहर दुमदुमले. या सहकार दिंडीत विविध सहकारी संस्थांचे अध्यक्ष, संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि नामांकित व्यक्तींनी सहभाग नोंदविला. दरम्यान, सहकार दिंडीच्या समारोप प्रसंगी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष डाॅ.शांतीलाल शिंगी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डाॅ.शिंगी म्हणाले, मराठवाड्यात सहकार क्षेत्र विस्तारले आहे. त्याची व्याप्ती होत आहे, मात्र या क्षेत्राकडे सकारात्मक बघण्याची गरज आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त महाराष्ट्रभर होत असलेल्या दिवंगत धनंजय गाडगीळ सहकार दिंडीचे ३ फेब्रुवारी रोजी माजलगाव शहरात जोरदार आगमन झाले. माजलगाव शहर आणि परिसरातील पतसंस्था, मल्टीस्टेटचे सर्व कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहकार दिंडीचे पुरोहित अनंत शास्त्री, श्री मंगलनाथ मल्टीस्टेटचे अध्यक्ष रामेश्वर कानडे, ॲड.विश्वास जोशी, वकील महासंघाचे अध्यक्ष ॲड.भानुदास डक, यांनी सहकार दिंडीचे स्वागत केले. अभूतपूर्व सहकार दिंडीत माजलगाव शहरातील व्यापारी, राजकीय क्षेत्रातील दिग्गज, डॉक्टर, वकील, पत्रकार व सहकार क्षेत्रातील विविध घटकांनी सहभाग घेऊन विविध ठिकाणी स्वागत केले. माँ वैष्णवी मंगल कार्यालय येथे सहकार दिंडीचा समारोप झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष डाॅ.शांतिलाल शिंगी होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फेडरेशनचे सचिव दादासाहेब तुपकर, लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विरेंद्र सोळंके, सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकारी विकास जगदाळे, सतिष शेरखाने, विजय सावध, माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे, सिताराम अर्बनचे सुशिल डक आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रास्ताविक श्री मंगलनाथ मल्टीस्टेटचे व्यवस्थापकीय संचालक ॲड.रविंद्र कानडे यांनी केली. याप्रसंगी तुळजाभवानी अर्बनचे अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ, सहाय्यक निबंधक विजय सावध यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्हारी मार्तंड अर्बनचे अध्यक्ष विशाल देवकते यांनी तर आभार प्रदर्शन संडेश्वर अर्बनचे अध्यक्ष नारायण शेजुळ यांनी केले. या सहकार दिंडीचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व पतसंस्था, मल्टीस्टेटच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नियोजन समितीने परिश्रम घेतले.
सहकार दिंडींने ऊर्जितावस्था निर्माण झाली : रामेश्वर कानडे
श्री मंगलनाथ मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर कानडे म्हणाले, काही घटकांमुळे सहकार क्षेत्रात थोडी मरगळ आली होती. मात्र सहकार क्षेत्र खूप व्यापक आहे. माजलगावात सहकार क्षेत्राची पाळंमुळं मजबूत आहेत. सहकार दिंडीमुळे नवा उत्साह संचारला आहे. सहकार चळवळ युवकांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. याचा अभिमान वाटतो, सहकाराला ऊर्जितावस्था देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेल्या युवक आणि महिलांची उपस्थिती सहकार दिंडीत लक्षणीय होती, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना कानडे यांनी दिली.
सहकार दिंडीमुळे व्यापक जनजागृती : चंद्रकांत शेजुळ
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने माजलगावात सहकार दिंडी काढण्यात आली. काही संस्थांच्या चुकीच्या धोरणामुळे सहकार क्षेत्रातील वातावरण काही अंशी दूषित होत असताना या सहकार दिंडीला मिळालेल्या प्रतिसादामुळे सकारात्मक वातावरण निर्मिती झाली. या दिंडीमुळे सहकार क्षेत्रात काम करणारा प्रत्येक घटकांना उत्साह निर्माण झाला, अशी प्रतिक्रिया तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.




Comment here