आपला जिल्हा

मेहनत, प्रामाणिकपणा आणि विश्वासाच्या जोरावर स्वप्नपूर्ती!

अवघ्या २२ वर्षीय सोमनाथ मुंडे यांनी घेतली महिंद्रा थार

धारूर : तालुक्यातील फकिरजवळा येथील २२ वर्षीय पदवीधर सोमनाथ मुंडे यांनी मेहनत, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या बळावर स्वतःची महिंद्रा थार चारचाकी घेत तरुणांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. उद्योजक भागवत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षे सातत्याने काम करत त्यांनी हे यश संपादन केले असून, भविष्यात व्यवसाय अधिक वाढवून स्वतःचे घर आणि शेती घेण्याचे स्वप्न त्यांनी व्यक्त केले.

फकिरजवळा (ता.धारूर) येथील २२ वर्षीय पदवीधर सोमनाथ मुंडे यांनी कष्ट, प्रामाणिकपणा आणि विश्वास या तीन मूल्यांच्या बळावर स्वतःची महिंद्रा कंपनीची ‘थार’ चारचाकी खरेदी करत यशाचे नवे शिखर गाठले आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबासह परिसरात आनंदाचे वातावरण असून अनेक तरूणांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत. सोमनाथ मुंडे हे गेल्या दोन वर्षांपासून उद्योजक भागवत दराडे यांच्या कंपनीत कार्यरत आहेत. गव्हर्नमेंट मार्केटिंग जीईएम पोर्टलवरील ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने काम करण्याची संधी भागवत दराडे यांनी दिली. सुरुवातीचे सुमारे पाच महिने काम समजून घेण्यासाठी गेले; मात्र त्यानंतर सातत्य, मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्वतःला सिद्ध केले.

चारचाकी खरेदी करण्यामागील उद्देश केवळ वैयक्तिक आनंद नसून कंपनीचा व्यवसाय अधिक वाढविणे आणि काम अधिक प्रभावीपणे पार पाडणे हा असल्याचे सोमनाथ यांनी सांगितले. या वाहनामुळे व्यवसायाच्या विस्ताराला गती मिळणार असल्याचा त्यांचा विश्वास आहे. सोमनाथ यांच्या आयुष्यात अनेक संघर्ष आले. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्याने घरातील सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. सध्या घरात आई आणि ते दोघेच राहतात, तर दोन बहिणींचे विवाह झाले आहेत. अशा परिस्थितीतही त्यांनी हार न मानता कष्टाच्या बळावर स्वतःची वाट निर्माण केली.

“प्रामाणिकपणे मेहनत केल्यास चांगले उत्पन्न मिळते आणि समाजात सन्मानाचे स्थानही मिळवता येते,” असा संदेश सोमनाथ मुंडे यांनी तरुणांना दिला. सातत्य, चिकाटी आणि जिद्द यांच्या बळावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. भविष्यात आणखी जोमाने काम करून स्वतःचे चांगले घर बांधणे आणि शेती घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या संपूर्ण यशाचे श्रेय देताना सोमनाथ म्हणाले की, “माझ्या आयुष्यात उद्योजक भागवत दराडे यांचे योगदान खूप मोठे आहे. लहानपणापासून त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केले, सतत प्रोत्साहन दिले आणि माझ्यावर विश्वास ठेवला. मेहनत, प्रामाणिकपणा आणि विश्वास या तिन्ही गोष्टींनी माझ्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवून आणला.”

“यशामागे भागवत दराडे यांचे मोलाचे योगदान”

उद्योजक भागवत दराडे यांनी सोमनाथ मुंडे यांच्यावर विश्वास दाखवत आपल्या कंपनीत कामाची संधी दिली. गेल्या दोन वर्षांत त्यांनी सातत्याने मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि योग्य दिशा दिल्यामुळे सोमनाथ यांनी स्वतःची ओळख निर्माण करत महिंद्रा थार खरेदी करण्याचे स्वप्न साकार केले. आपल्या यशामागे भागवत दराडे यांचे मार्गदर्शन आणि विश्वास हेच सर्वात मोठे बळ असल्याची कृतज्ञ भावना सोमनाथ मुंडे यांनी व्यक्त केली.

Comment here