आपला जिल्हा

आरक्षित मोकळ्या जागेवरील वाढत्या अतिक्रमणामुळे माजलगावकरांना श्वास गुदमरतोय

युवा नेते तौफीक पटेल यांचा लक्षवेधी दावा; बालकांना उद्यान नाही, जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळाही दुरापास्त 

माजलगाव : माजलगाव शहर आणि तालुका सिंचन क्षेत्रामुळे इतर तालुक्याच्या तुलनेत विकासाच्या मुख्य प्रवाहात आहे. मात्र असे असले तरी वाढत्या सिमेंटच्या आरक्षित मोकळ्या जागेवरील अतिक्रमणामुळे माजलगावकरांचा श्‍वास गुदमरतोय. कुठेही मोकळी जागा उपलब्ध नसल्याचे भयावह चित्र दिसत आहे. दरम्यान, तत्कालिन राज्यपाल महोदयांनी शहरातील गरीब आणि गरजूंना दिलेली तब्बल १४ एकर जमीन अतिक्रमणांनी गिळंकृत करून टाकली आहे, असा खळबळजनक दावा माजलगाव नगर परिषदेचे माजी सभापती तौफीक पटेल यांनी केला आहे.

माजलगाव शहर विकासाच्या बाबतीत प्रगतीपथावर असले तरी सिमेंटच्या जंगलात मोकळा श्वास घेणे दुरापास्त झाले आहे. बालकांना खेळण्या-बागडण्यासाठी कुठेही उद्यान अथवा मोकळी जागा उपलब्धच नसल्याने त्यांचे बालपण चार भिंतींच्या आताच गुदमरून जात आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात बालकांना आपल्या कलागुणांना, कसरतींना वाव मिळण्यासाठी प्रत्येक शहरात मध्यवर्ती ठिकाणी मोकळी जागा किंवा उद्यान उभारलेले असते. मात्र माजलगाव शहरात उद्यानच नाही किंवा पुरेशी मोकळी जागा सुध्दा उपलब्ध नाही. ही माजलगावकरांची शोकांतिका आहे, असेही तौफीक पटेल म्हणाले. मुलांप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा होण्यासाठी कोणतीही स्वतंत्र मोकळी जागा किंवा उद्यान नाही, याकडेही तौफीक पटेल यांनी लक्ष वेधले. दरम्यान, माजलगाव नगर पालिकेने ओपन स्पेस विकण्याचा घाट घातला आहे. ही गंभीर बाब असल्याचे तौफीक पटेल यांनी निदर्शनास आणून दिले आहे. परभणी फाटा, सिंदफणा पूल ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत एकही वृक्ष नाहीत. याबाबत काही स्वयंसेवी संस्थांनी प्रयत्न केले, मात्र ते तोडके पडत आहेत. त्याला बळ देण्याचे काम शासनाने करण्याची गरज आहे.

हरवलेली ती जागा शोधण्याचे जिल्हाधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान 

तत्कालिन राज्यपाल महोदयांनी माजलगाव शहरातील गरीब आणि गरजूंना तब्बल १४ एकर जमीन घरकुलासाठी आदेशित केली होती. या जागेवर अतिक्रमण करून संबंधित जागा गायब झाली आहे. या प्रकरणी बीडचे नवे जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांच्यासमोर संबंधित जागा शोधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. मात्र कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी जाॅन्सन हे गोरगरीब जनतेला निश्चित न्याय मिळवून देतील, असा आशावादही तौफीक पटेल यांनी व्यक्त केला.

‘मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार’

वृक्षसंवर्धनासाठी आलेला निधी गेला कुठे? आणि ओपन स्पेसची जागेची केलेली विल्हेवाट? या प्रश्नी शासनाने गंभीर दखल घेऊन विभागीय आयुक्त किंवा सचिव पातळीवर कसून चौकशी करावी, अशीही मागणी तौफीक पटेल यांनी केली. ही मागणी धसास लावण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना भेटून कैफियत मांडणार असल्याची माहिती तौफीक पटेल यांनी दिली.

Comment here