माजी आमदार आर.टी.देशमुख यांचा अपघातात मृत्यू
बीड : लातूर-औसा रोडवर बेलकुंडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात भाजपचे माजी आमदार आर.टी.देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी पाच वाजेच्या दरम्यान झाल्याची माहिती आहे. देशमुख हे माजलगाव मतदारसंघात २०१४ ते २०१९ साली आमदार होते. दरम्यान, माजी आमदार आर.टी.देशमुख यांची सामान्य माणसांचा आमदार अशी सर्वत्र ओळख होती.
अधिक माहितीनुसार, माजी आमदार आर.टी.देशमुख हे औसाकडे चारचाकी गाडीतून येत होते. बेलकुंडीजवळ उड्डाणपुलावरून जाताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी उलटली. या भीषण अपघातात देशमुख गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रूग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अपघात एवढा भीषण होता की गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. जिजा म्हणून सर्वत्र परिचित असलेले आर.टी.देशमुख हे माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. २०१४ मध्ये माजलगावमध्ये राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांचा देशमुख यांनी जवळपास ३७ हजार मताधिक्क्याने पराभव केला होता. त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने एक अनुभवी व प्रगल्भ नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर चारचाकी रस्त्याच्या बाजूला उलटली. गाडीने दोन ते तीन पलट्या घेतल्याची माहिती आहे. गाडीतील चालक आणि माजी आमदार देशमुख दोघेही गंभीर जखमी झाले. रस्त्यावरील वाहनधारकांनी धाव घेऊन दोघांना गाडीतून बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या देशमुख यांना तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. देशमुख कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात वर्तमान माध्यम समूह सहभागी आहे.



Comment here