माजलगाव : सद्गुरू श्री मिस्किन स्वामी मठ संस्थान येथे शेकडो शिवभक्तांनी सोमवार व्रत उद्यापनाची सांगता केली. यावेळी मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात होमहवन आणि विविध धार्मिक विधी करण्यात आले. दरम्यान, या सोमवार व्रत उद्यापनाला समाजातील सर्व घटकांचा समावेश होता.
वीरशैव लिंगायत समाजात सोमवार प्रदोष व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवभक्त सोमवार व्रत नित्याने करत असतात. आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी शिवभक्त या व्रताचे पालन करतात. मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली मठात शेकडो शिवभक्त दाम्पत्यांनी या व्रताची सांगता केली. यावेळी होमहवन याच्यासह विविध धार्मिक विधी पार पाडल्या. श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी सोमवार व्रत उद्यापन विषयी आपले आशीवर्चनपर मार्गदर्शन करताना दिव्य संदेश दिला. जीवन संस्कारक्षम करण्यासाठी वीरशैव लिंगायत समाजात सोमवार व्रत उद्यापणाला महत्त्व आहे. एकीकडे स्पर्धेच्या युगात आधुनिकतेला महत्त्व दिले जात असले तरी दुसरीकडे अध्यात्माची जोड देणे क्रमप्राप्त आहे. जीवनात आपण सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी सोमवार व्रत करणे अगत्याचे आहे. श्री संस्थान मठ माजलगाव नेहमीच धार्मिक आणि लोकोपयोगी कार्याला महत्त्व देत आहे. यापुढेही अविरतपणे धार्मिक यज्ञ तेवत राहील, अशी माहिती मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी दिली. दरम्यान, सोमवार दिनांक 23 जून रोजी झालेल्या या सोमवार, प्रदोष, शिवरात्री व्रत उद्यापन कार्यक्रमाला शेकडो शिवभक्तांनी सहभाग नोंदवला. भक्तांचा विविध धार्मिक कार्यक्रमातील सहभाग तेवढाच महत्त्वपूर्ण आहे.




Comment here