आपला जिल्हा

सहकार, शिक्षण क्षेत्रात मंगलाताई सोळंके यांचे कार्य नोंद घेण्यासारखे

प्रसिद्ध उद्योजिका राजश्रीताई हेमंत पाटील यांचे गौरवोद्गार; माजलगावात मंगलाताई सोळंके यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला अलोट गर्दी

माजलगाव : आज महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत, त्याला सहकार क्षेत्रही कसे अपवाद असेल. माजलगाव विधानसभा मतदारसंघात मंगलाताई प्रकाशदादा सोळंके यांचे सहकार क्षेत्रात मोठे योगदान आहे. राजकीय आणि सामाजिक पटलावर मंगलाताई यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली, असे गौरवोद्गार नांदेडच्या गोदावरी उद्योग समुहाच्या सर्वेसर्वा राजश्रीताई हेमंत पाटील यांनी माजलगाव येथे काढले. त्या माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मंगलाताई प्रकाशदादा सोळंके यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते डॉ.प्रकाश आनंदगावकर होते तर मंचावर आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार मोहनराव सोळंके, राधाकृष्ण होके पाटील, उद्योजक डॉ.आर.जी.बजाज, बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे, वडवणीचे नगराध्यक्ष शेषेराव जगताप, माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या सचिव नीलाताई देशमुख, लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखान्याचे अध्यक्ष विरेंद्र सोळंके, उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयसिंह सोळंके, तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ, श्री मंगलनाथ मल्टीस्टेटचे सीईओ रविंद्र कानडे, आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना राजश्रीताई पाटील म्हणाल्या, “महिलांनी केवळ साक्षर होणे पुरेसे नाही, तर त्यांनी आर्थिक साक्षर व्हावे, यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेणे काळाची गरज आहे. महिला या विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या घटक आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मराठवाड्यात मंगलाताई सोळंके यांनी सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात उभे केलेले काम अतिशय नोंद घेण्यासारखे आहे.” असे स्पष्ट व प्रेरणादायी विचार राजश्रीताई पाटील यांनी व्यक्त केले.

सत्कारमूर्ती मंगलाताई सोळंके यांचा विविध शैक्षणिक संस्था, हितचिंतक आणि निकटवर्तीयांनी एकत्र येऊन हा दिमाखदार सोहळा यशस्वी केला. “मंगलाताई सोळंके म्हणजे कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्वाचा त्रिवेणी संगम होय. त्यांच्या नेतृत्वात माजलगाव परिसरात शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रात भरीव योगदान आहे. त्यांच्या दिशादर्शक दृष्टिकोनातून हजारो कुटुंबांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक स्वावलंबन मिळवले असले, तरी आता त्या पुढे जाऊन आर्थिक साक्षर होणे गरजेचे आहे. भविष्यात प्रत्येकाने स्वतःच्या बचतीचा मार्ग पत्करावा,” असेही आवाहन राजश्रीताई पाटील यांनी केले.

या अभिष्टचिंतन सोहळ्याला संपूर्ण माजलगाव विधानसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सौ.मंगलाताई सोळंके यांना शुभेच्छा दिल्या. सामाजिक बांधिलकी जपत या सोहळ्याचा एक भाग म्हणून रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. सौ.मंगलाताई सोळंके यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात बाबा देशमाने, भगीरथ तोडकरी संपादित विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.प्रकाशराव आनंदगावकर यांनी अध्यक्षीय समारोपात सौ.मंगलाताई सोळंके यांचे कौतुक करत सोळंके घराण्याचा दैदिप्यमान वारसा विशद केला. कार्यक्रमाला शेकडो महिला आणि पुरूषांची लक्षणीय संख्या उपस्थित होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुहास सोळंके, शेख अनवर, राहुल कदम, महादू वाघ, विनोद कुमार, डाॅ.के.अनंत बाबू, भगवान शेजुळ, इरफान पठाण यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन सखाराम जोशी, वरूणराज तौर यांनी तर आभार विरेंद्रदादा सोळंके यांनी मानले.

माझ्या संघर्षाच्या काळात मंगला यांची समर्थ साथ लाभली : आमदार प्रकाश सोळंके

या अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना आमदार प्रकाशदादा सोळंके म्हणाले, माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनात सौ.मंगला यांचे अमूल्य योगदान आहे. जीवनातील संघर्षाच्या काळात त्यांनी दिलेली खंबीर साथ विसरणे शक्य नाही. आज त्यांचा ७० वा वाढदिवस आणि अभिष्टचिंतन सोहळा होत आहे. त्यांचा शंभरावा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य मला लाभावे, अशा सदिच्छा आमदार सोळंके यांनी व्यक्त केल्या.

अभिष्टचिंतन सोहळा जीवनातील अविस्मरणीय क्षण : मंगलाताई सोळंके 

सत्काराला उत्तर देताना मंगलाताई सोळंके म्हणाल्या, महिला सक्षमीकरण काळाची गरज आहे. याबाबत प्रत्येक महिलेने जागरूक होणे गरजेचे आहे. महिलांनी आपापल्या क्षेत्रात प्रगती करावी. माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरणासाठी बळ देण्याचे भाग्य मला लाभले. माजलगावकरांच्या जिव्हाळ्यातून उतराई होणे शक्य नाही, माझ्यासाठी हा अभिष्टचिंतन सोहळा जीवनातील एक अविस्मरणीय क्षण आहे, असे भावपूर्ण उद्गार मंगलाताई सोळंके यांनी काढले.

माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या सर्वेसर्वा मंगलाताई प्रकाश सोळंके यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध केलेल्या वर्तमान माध्यम समुहाच्या विशेषांकाचे प्रकाशन करताना प्रसिद्ध उद्योजिका तथा व्याख्यात्या राजश्रीताई हेमंत पाटील.

Comment here