माजलगाव : नगरपरिषदेकडील सफाई कामगारांनी हक्काचे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन तातडीने अंमलात आणावे या मागण्यांसाठी दिनांक २२ सप्टेंबर सोमवारपासून नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे. या आंदोलनामुळे नगरपरिषद प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
राज्य शासनाने सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ लागू केला आहे. मात्र माजलगाव नगरपरिषदेकडील काही कर्मचाऱ्यांना आजही तो मिळालेला नाही. याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार पाठपुरावा करूनही नगरपरिषदेकडून ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड नाराजी असून अखेर त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. याबाबत संघटनेकडून वारंवार मागणी होऊनदेखील प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. या उपोषणामध्ये नगरपरिषद सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी तसेच सर्व कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. “सातवा वेतन आयोग हा आमचा हक्क आहे. तो आम्हाला दिलाच पाहिजे अन्यथा आमचे उपोषण अधिक तीव्र केले जाईल,” असा इशारा कामगारांनी दिला आहे. कामगारांच्या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास हे आंदोलन पुढे उग्र रूप धारण करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. उपोषणामुळे नगरपरिषद प्रशासनासमोर निर्माण झालेली कोंडी दूर करण्यासाठी आता मुख्याधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Comment here