आपला जिल्हा

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तात्काळ अग्रिम मदत करावी

बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे तौफीक पटेल यांची मागणी

माजलगाव : बीड जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान मांडले असून अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अशा परिस्थितीत माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित नगदी अग्रिम मदत देण्यासाठी बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रशासनाला निर्देश द्यावेत, अशी मागणी युवा नेते तथा माजलगाव नगरपरिषदेचे माजी सभापती तौफीक पटेल यांनी केली आहे.

माजलगाव तालुक्यात अतिवृष्टीचा कहर झाला असून माजलगाव धरण आणि सर्व जलप्रकल्प ओसंडून वाहत आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे. उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. बीड जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशीही मागणी तौफीक पटेल यांनी लावून धरली आहे. बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनाच्या निमित्ताने बीड जिल्हा दौर्‍यावर आहेत. उपमुख्यमंत्री महोदयांनी या ज्वलंत प्रश्नी लक्ष घालून अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना त्वरित नगदी अग्रिम मदत देण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांच्याकडून जिल्हावासियांना मोठ्या अपेक्षा आहेत, असा आशावादही तौफीक पटेल यांनी व्यक्त केला.

‘सांडस चिंचोलीप्रश्नी शासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावा’

माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली हे गाव महापूर आला की, राज्यभर चर्चेत येते. सध्या गेली तीन दिवसांपासून सांडस चिंचोलीचा संपर्क तुटलेला आहे. चोहाबाजूंनी सिंदफणा नदीच्या पाण्याचा वेढा आहे. ‘नेहमीच येतो पावसाळा’ या म्हणीप्रमाणे महापूर आला की सांडस चिंचोलीचा विषय ऐरणीवर येतो. मात्र पूर ओसरला की या विषयाकडे कानडोळा होतो शासनाने इतरत्र पुनर्वसन करावे अन्यथा भव्य पूल उभारून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी तौफीक पटेल यांनी केली आहे.

Comment here