बीड : कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवून शेती व दुग्धव्यवसाय अधिक सक्षम आणि शाश्वत करण्याच्या उद्देशाने ‘कृषी समृद्धी योजना २०२५-२०२६’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत दुग्धव्यवसाय अधिक आधुनिक करण्यासाठी आणि स्वच्छ दूध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ५० टक्के अनुदानावर मिल्किंग मशीन वाटप करण्यात येणार आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कृषीक्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे आणि हवामानानुकूल तसेच शाश्वत शेतीला चालना देणे हा आहे. या अंतर्गत दुग्धव्यवसायिकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वच्छ आणि दर्जेदार दूध उत्पादनास प्रोत्साहन दिले जाणार आहे. लाभार्थ्यांना मिल्किंग मशीन खरेदीच्या रकमेच्या ५० टक्के किंमत किंवा कमाल रु. २०,००० पर्यंत अनुदान मिळणार आहे. त्यासाठीचा अर्ज नमुना संबंधित तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे उपलब्ध आहे. अर्ज पूर्ण भरून २२ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सादर करावा.
योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत :
1. अर्जदार पशुपालकाकडे किमान सहा दुधाळ जनावरे (गाय/म्हैस) असावीत.
2. सर्व जनावरांच्या कानात NDLM अंतर्गत बिल्ला असणे आवश्यक आहे.
3. जनावरांची नोंद भारत पशुधन अॅपवर असणे बंधनकारक आहे.
4. अर्जदाराने सहकारी किंवा खाजगी दूध संघाकडे किमान तीन महिने दुग्धपुरवठा केल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
5. निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना तांत्रिक मानक पूर्ण करणाऱ्या मशीनसाठीचे अनुदान डीबीटीद्वारे थेट त्यांच्या खात्यात जमा केले जाईल.
6. लाभार्थ्यांची निवड कॉम्प्युटराईज्ड रँडमायझेशन पद्धतीने केली जाणार आहे.
बीड जिल्ह्यातील पात्र पशु पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग, बीड डॉ.आर.डी.कदम यांनी आवाहन केले असून धारूर तालुका पशुधन विकास अधिकारी अविनाश फुंदे यांनी पंचायत समिती धारूरच्या वतीने वरिष्ठाच्या सुचनेनुसार धारूर तालुक्यातील पशु पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशे आवाहन केले आहे.
अविनाश फुंदे, पशुधन विकास अधिकारी धारूर तालुका



Comment here