आपला जिल्हा

भ्रष्ट लोकांना सत्तेपासून रोखले पाहिजे

मंत्री पंकजा मुंडे यांची मतदारांना साद 

माजलगाव : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भ्रष्ट लोकांना सत्तेपासून रोखले पाहिजे. स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवारांच्या हाती नगरपालिकेची सत्ता द्यावी, असे आवाहन भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी मतदारांना केले आहे.

नगरपरिषद निवडणुकीतील भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कु.संध्या ज्ञानेश्वर मेंडके तसेच अन्य सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ संध्याकाळी जाहीर सभेतून मतदारांशी संवाद साधला. ज्येष्ठ नेते राधाकृष्ण होके पाटील, डाॅ.प्रकाश आनंदगावकर, जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी, माधवराव निर्मळ, मंडल अध्यक्ष विनायक रत्नपारखी, रूपाली कचरे, अभिजित सोळंके आदी मान्यवर उपस्थित होते.

माजलगाव नगरपरिषदेचा कारभार भ्रष्टाचार मुक्त करून जनतेला विकासाच्या अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. उच्चशिक्षित व तरूण महिला नेतृत्व म्हणून आम्ही कु.संध्या ज्ञानेश्वर मेंडके यांना रिंगणात उतरवले आहे. स्वच्छ व सुंदर शहर, चांगले रस्ते, आरोग्याच्या सोयी, घनकचरा प्रकल्प राबविण्या बरोबरच निर्भय शहर करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. नगराध्यक्षासह भाजपाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणा, चांगल्या माणसांच्या हाती सत्ता द्या माजलगाव शहराच्या भरभरून विकासाचा शब्द मी तुम्हाला देते, अशा शब्दांत मंत्री पंकजा मुंडे यांनी मतदारांना आवाहन केले.

 

Comment here