माजलगाव : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार मेहरूनबी खलील पटेल आत्तार आणि सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जनतेशी संवाद साधला.
माजलगाव शहर आणि तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी खलील पटेल आत्तार यांच्या परिवारानं अनेक वर्षे काम केलं आहे. त्यामुळे मेहरूनबी खलील पटेल आत्तार यांच्या रूपानं आम्ही योग्य उमेदवार उपलब्ध करून दिला असल्याचं सभेत त्यांनी स्पष्ट केलं. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेनं आम्ही वाटचाल करतोय. माजलगाव स्वच्छ, सुंदर, आधुनिक व्हायला हवं. त्यासाठी निधीचा योग्य वापर होणं अत्यावश्यक आहे, त्या अनुषंगानं आमची उमेदवारांची निवड बरोबर केली आहे, असाही दावा पवार यांनी केला.
माजलगावमधील एस.टी.स्टँडची अवस्था दयनीय आहे, ती सुधारण्याची जबाबदारी आमची आहे. माजलगाव शहरात अजूनही पाणी, कचरा व्यवस्थापन, रस्ते-खड्डे, अतिक्रमण अशा अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे फंड, सीएसआर निधी, राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना इत्यादी सगळं आणू. कारण, महायुतीचं सरकार आहे, आमदार प्रकाश सोळंके हे आपले आहेत, ते काम करणारं असं नेतृत्व आहेत. माजलगावात विमानतळ सर्वेक्षण, सीआयआयआयटीची स्थापना, रोजगारनिर्मिती यांसारखी कामं गतीनं सुरू होतील, मात्र त्याकरता सक्षम प्रतिनिधित्व करणारी लोकं हवीत, जी आम्ही दिली आहेत.
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मूल्यांचा आपण आदर केला पाहिजे. सत्ता येत-जात असते; पण सत्तेत राहून लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणं, हे आमचं कर्तव्य आहे, अशी भावना सभेत व्यक्त केली. सर्व समाजघटकाला विकासाच्या प्रवाहात सोबत घेऊन जाणं, हीच आमची भूमिका आहे. येत्या २ तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबा आणि आमच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मतांनी निवडून द्या, असं आवाहन नागरिकांना केलं. माजलगाव शहराचा चेहरामोहरा आम्ही बदलवून दाखवू, असं वचन अजित पवार यांनी दिलं.






Comment here