आपला जिल्हा

संपादक बालासाहेब फपाळ यांचे मायेचे छत्र हरपले

माजलगाव : तालुक्यातील बेलुरा येथील मूळ रहिवासी व सध्या तेलगाव येथे वास्तव्यास असलेले साप्ताहिक जन्सामान्यांचा विकासनामा या वृत्तपत्राचे संपादक बालासाहेब दामोधर फपाळ यांच्या मातोश्री मंदिराबाई दामोधर फपाळ (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने गुरूवार, दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने फपाळ कुटुंबावर शोककळा पसरली असून संपादक बालासाहेब फपाळ यांचे मायेचे छत्र हरपले आहे.

मंदिराबाई फपाळ या स्वभावाने अतिशय शांत, मनमिळावू, कष्टाळू आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या. कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी त्या आधारस्तंभ होत्या. कुटुंब, नातेसंबंध आणि समाज यांना एकत्र बांधून ठेवणारी त्यांची भूमिका सर्वश्रुत होती. त्यांच्या संस्कारामुळेच फपाळ कुटुंबात मूल्याधिष्ठित विचार, सेवाभाव आणि सामाजिक जाणिवा रुजल्या असल्याचे कुटुंबीय व आप्तस्वकीय आवर्जून सांगतात.

संपादक बालासाहेब फपाळ यांनी आपल्या मातोश्रींची सेवा अत्यंत प्रेमाने व जबाबदारीने केली. त्यांच्या आजारपणातही त्यांनी कोणतीही कमी पडू दिली नाही. आई–मुलातील जिव्हाळ्याचे नाते परिसरात परिचित होते. मात्र काळाच्या नियमानुसार मंदिराबाई फपाळ यांचे निधन झाले आणि बालासाहेब फपाळ यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, ग्रामस्थ व नातेवाईकांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. मंदिराबाई फपाळ यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी व अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मंदिराबाई दामोधर फपाळ यांच्या निधनाने एक कर्तव्यदक्ष माता, प्रेमळ आजी आणि संस्कारक्षम गृहिणी काळाच्या पडद्याआड गेल्या असून त्यांचे स्मरण कायम राहील, अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. फपाळ परिवारावर कोसळलेल्या दुखाःत वर्तमान माध्यम समूह सहभागी आहे.

Comment here