तिरंग्याच्या नावाने षडयंत्र; बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल, अवमान याचिका दाखल करणार
बीड : गेल्या काही दिवसांपासून बीड शहरातील रहिवासी व महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांच्याबाबत सोशल मीडियावर व काही माध्यमांत तिरंग्याच्या अपमानासंदर्भात चुकीची माहिती पसरवण्यात येत होती. या प्रकरणी समीर काझी यांच्याशी थेट संपर्क साधला असता त्यांनी याबाबत सविस्तर खुलासा केला आहे.
समीर काझी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “तिरंगा ही माझी ओळख व शान आहे. माझ्या अंगाच्या कणाकणात तिरंगा आहे. तिरंग्याचा अपमान माझ्याकडून झाला नाही आणि मी तो कधीही होऊ देणार नाही.” नाहक बदनामी करून आपल्याला वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोपही काझी यांनी केला आहे. दरम्यान, नाहक बदनामी करून वेठीस धरणाऱ्या व्यक्तींविरूद्ध न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती समीर काझी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या प्रकरणी संबंधित इसमाविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत गुन्हा नोंदवला आहे. संबंधित इसमास एक लाख रूपयांच्या बॉण्डवर जामीन देण्यात आला असून, त्याला चार दिवस पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील रहिवासी असणारे समीर काझी यांच्या घरावर फडकवण्यात आलेल्या तिरंग्याचा अपमान झाल्याचा दावा करत सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. याच आधारे काही माध्यमांत चुकीची माहिती प्रसिद्ध करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची व पदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली होती.
या सर्व प्रकरणाचे सत्य जाणून घेण्यासाठी समीर काझी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हा प्रकार जाणीवपूर्वक व कटकारस्थानातून करण्यात आला आहे. “भारताचा कोणताही नागरिक तिरंग्याचा अपमान करू शकत नाही. तिरंगा ही प्रत्येक भारतीयाची शान आहे. माझ्या मनामनात तिरंगा आहे आणि त्याचा अपमान मी सहन करणार नाही,” असेही त्यांनी नमूद केले. आपल्याला ब्लॅकमेल व बदनाम करण्याच्या उद्देशाने हे षड्यंत्र रचण्यात आल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे दिली असून, त्यानुसार शेख अमीर या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित इसमाला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. नाहक बदनामी करून वेठीस धरणाऱ्या व्यक्तींविरुद्ध न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती समीर काझी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. हे प्रकरण नेमके कोणत्या हेतूने करण्यात आले, याबाबत शहरात विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.



Comment here