जनसंपर्काच्या जोरावर विजयाचा विश्वास
धाराशिव : तालुक्यातील कनगरा येथील तसेच पाडोळी (आ) गणातील पंचायत समितीचे चर्चित उमेदवार सतीश गुंड यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत प्रस्थापित राजकारण्यांना थेट आव्हान दिले आहे. विकासाच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या आणि वारंवार पक्ष बदलणाऱ्या लोकांना पराभूत करून अपक्षाला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.
गुंड यांची कनगरा ही कर्मभूमी, तर पाडोळी (आ) ही जन्मभूमी असून टाकळी, धुत्ता यासह परिसरातील इतर गावांतही त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. या बळावर आपण निश्चित विजयी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत राहून गुंड यांनी सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडण्याचे काम केले आहे. “राजकारण हा माझा पिंड नाही, मात्र सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याची भूमिका आहे. स्वार्थासाठी सतत पक्ष बदलून माकडासारख्या उड्या मारणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठीच पंचायत समितीची लढत आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या सतीश गुंड यांच्या राजकीय प्रवेशामुळे पाडोळी (आ) परिसरातील राजकीय वातावरण तापले असून पक्षीय उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवार म्हणून गुंड यांचीच सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे. गावांना विश्वासात न घेता राजकारण करणाऱ्यांना सुशिक्षित व सुज्ञ मतदार यावेळी मतांच्या माध्यमातून धडा शिकवणार, अशी चर्चा सर्वसामान्य मतदारांमध्ये सुरू असल्याने राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Comment here