आपला जिल्हा

सन्मान, समता, बंधुतेमुळे समाज परिवर्तन घडते : ॲड.पल्लवी सोळंके

माजलगाव विकास प्रतिष्ठानतर्फे सर्वसमावेशक हळदी-कुंकू समारंभ

माजलगाव : सन्मान, समता, बंधुतेमुळे समाजपरिवर्तन घडते असे प्रतिपादन दिनबंधू नागरी सहकारी पतसंस्था धारूर च्या अध्यक्षा ॲड.पल्लवी सोळंके व्यक्त यांनी केले. त्या माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हळदी-कुंकू समारंभात बोलत होत्या. हा सोहळा केवळ पारंपरिक, धार्मिक विधीपुरता मर्यादित न राहता सामाजिक समतेचा, सन्मानाचा व समावेशकतेचा ठोस संदेश देणारा ठरला. समाजातील विविध स्तरांतील महिलांना एकत्र आणत, विशेषतः आशा सेविका, स्वच्छता कर्मचारी, परिचारिका, विधवा महिला तसेच इतर गरजू व दुर्लक्षित घटकांतील महिलांचा सन्मानपूर्वक सहभाग या कार्यक्रमात नोंदवण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, परंपरेनुसार अनेक सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांत विधवा महिलांना सहभागी करून घेतले जात नाही. मात्र या रूढी व सामाजिक बंधनांना छेद देत माजलगांव विकास प्रतिष्ठानने जाणीवपूर्वक विधवा महिलांनाही सन्मानाने सहभागी करून घेत, समाजातील विचारसरणीत सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला. हा उपक्रम केवळ औपचारिक न राहता महिलांमध्ये आत्मसन्मान, आपुलकी व स्वीकाराची भावना निर्माण करणारा ठरला. या कार्यक्रमाला माजलगाव नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा महरीन शिफा बिलाल चाऊस, नीला देशमुख, जयश्री सावंत आणि सुवर्णा शिंगणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सामाजिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित करत, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडते, असे मत व्यक्त केले. महिलांच्या सशक्तीकरणासाठी केवळ योजना नव्हे, तर मानसिकता बदलणारे सामाजिक उपक्रम अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.कार्यक्रमात उपस्थित हळदी-कुंकू, भेटवस्तू आणि विचारधन देऊन स्वागत करण्यात आले. विविध क्षेत्रांत सेवा देणाऱ्या महिलांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. स्वच्छता कर्मचारी, आरोग्य सेविका व परिचारिकांच्या सेवेमुळे समाज सुरळीत चालतो, मात्र त्यांच्या कार्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. त्यामुळे त्यांना मंचावर सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव करणे हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग ठरला.कार्यक्रमस्थळी आनंद, उत्साह व भावनिक आपुलकीचे वातावरण अनुभवायला मिळाले. अनेक महिलांनी अशा प्रकारे सन्मानाने सहभागी होता आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. काही महिलांसाठी हा पहिलाच असा सामाजिक कार्यक्रम होता, जिथे त्यांना कोणताही भेदभाव न करता सामावून घेण्यात आले.

माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सामाजिक बदल हा केवळ भाषणांतून होत नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून घडवावा लागतो. महिलांमधील भेद, रूढी आणि मानसिक अडथळे दूर करून सर्वांना एकत्र आणण्याचा हा एक छोटासा, पण अर्थपूर्ण प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काळातही अशा सामाजिक उपक्रमांची मालिका राबवण्याचा मानस प्रतिष्ठानने व्यक्त केला. या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.वरूणराज तौर, महादेव वाघ, इरफान पठाण, सखाराम जोशी, ज्योती जोशी, अर्चना जाधव, संतोष पालकर आणि देवेंद्र सोळंके इत्यादींनी परिश्रम घेतले.

Comment here