आपला जिल्हा

माजलगावात वाळू हप्तेखोरी उघड

माजलगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

माजलगाव : वाळूची वाहने सुरळीत चालू देण्यासाठी दरमहा २० हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी तातडीने कठोर पाऊल उचलत शहर पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी केली आहे.

बीड जिल्ह्यात वाळूचे टेंडर होऊन अवघे चार दिवस झाले असतानाच हप्तेखोरी सुरू झाल्याचे समोर आले आहे. माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी अमोल कदम याने एका तक्रारदाराकडे वाळू वाहतूक सुरळीत राहण्यासाठी दरमहा २० हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम खासगी इसम तात्यासाहेब आर्डे याच्यामार्फत स्वीकारली जाणार होती. जालना एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधव यांच्या पथकाने बुधवारी माजलगाव बायपास रोडवरील लेंडाळ हॉस्पिटलसमोर सापळा रचला. कदमच्या सांगण्यावरून तात्यासाहेब आर्डे याने २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबी पथकाने दोघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हप्तेखोरी प्रकरणानंतर एसपींचा धडाका

या लाचखोरीच्या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन झाल्याचे लक्षात येताच पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची तडकाफडकी शहर ठाण्यातून उचलबांगडी करत नियंत्रण कक्षात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, माजलगाव शहर पोलीस ठाण्याचा नवीन पदभार पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्याकडे सोपवण्यात आला असून त्यांनी तात्काळ कार्यभार स्वीकारला आहे.

पाटोदानंतर माजलगावातही निरीक्षकांची उचलबांगडी

काही दिवसांपूर्वी पाटोदा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने वाळू प्रकरणात लाच घेतल्याप्रकरणी तेथील पोलीस निरीक्षकांचीही उचलबांगडी करण्यात आली होती. आता माजलगावच्या घटनेनंतर पुन्हा एकदा तशीच कठोर कारवाई झाल्याने संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. “भ्रष्टाचार करणाऱ्यांची तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही,” असा स्पष्ट आणि कडक संदेश पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी या कारवाईतून दिला आहे.

Comment here