महा-राष्ट्र

सोन्याच्या दरांत मोठी घसरण येणार?

७० हजारांपर्यंत घसरणीची शक्यता; तज्ज्ञांचा इशारा, खरेदीदार सावध

दिल्ली : सोन्याच्या दरांमध्ये सध्या मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे. कधी अचानक घसरण तर कधी नवे उच्चांक, अशा चढ-उतारांमुळे सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषतः लग्नसराई सुरू असल्याने, “आता सोने घ्यावे की भाव आणखी कमी होण्याची वाट पाहावी?” असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. दरम्यान, काही तज्ज्ञांकडून प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ७० हजार रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या दरांवर दबाव येण्यामागे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकन अर्थव्यवस्थेतील घडामोडी. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रभावाखाली राबवण्यात येणाऱ्या आर्थिक धोरणांमुळे डॉलर मजबूत झाला आहे. डॉलर मजबूत झाल्यास सोन्यातील गुंतवणूक कमी होते, कारण गुंतवणूकदार शेअर बाजार आणि इतर पर्यायांकडे वळतात.

दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे जागतिक युद्धाची भीती काही प्रमाणात कमी होणे. रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्यपूर्वेतील तणावामुळे मागील काळात सोने सुरक्षित गुंतवणूक मानले जात होते. मात्र सध्या राजकीय परिस्थितीत बदल झाल्याने युद्धाचा धोका कमी झाला असून, अनेक गुंतवणूकदार सोन्यातील नफा काढून शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. यालाच ‘नफा बुकिंग’ म्हटले जाते, ज्याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतींवर होत आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने महत्त्वाची सपोर्ट लेव्हल गमावल्यास भारतीय बाजारात दर झपाट्याने घसरू शकतात. तसेच, रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाल्यास सोन्याचा आयात खर्च कमी होऊन दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. मात्र ही घसरण एका दिवसात होणार नाही, तर ती टप्प्याटप्प्याने होईल, असे तज्ज्ञ स्पष्ट करतात. येत्या काही दिवसांत बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता असून, अधूनमधून दर वाढू शकतात; परंतु एकूण कल घसरणीकडे असल्याचे संकेत आहेत.

अशा परिस्थितीत घाईघाईने निर्णय न घेता, एकाच वेळी मोठी खरेदी टाळावी. भाव घसरत असताना थोड्या-थोड्या प्रमाणात सोने खरेदी केल्यास चढ-उतारांचा धोका कमी होऊ शकतो, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. सध्या (फेब्रुवारी २०२६) सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १.५० लाख ते १.५८ लाख रुपये दरम्यान फिरत असून, त्यामुळे घसरणीची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. बाजार अस्थिर असल्याने, नियमित अपडेट्स घ्यावेत आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच निर्णय घ्यावा. सोने ही दीर्घकालीन गुंतवणूक असल्याने संयम राखणेच फायदेशीर ठरू शकते.

(टीप : वरच्या बातमीत दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या बातमीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

Comment here