माजलगाव : माजलगाव नगरपालिकेतील कामांसाठी नागरिकांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारींमुळे सामान्य जनता त्रस्त असतानाच, एका गंभीर घटनेमुळे नगरपालिका प्रशासन ढवळून निघाले आहे. पालिकेतील एका कर्मचाऱ्याने कामासाठी पैसे मागितल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नगराध्यक्षपती यांनी संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारत थेट कारवाईची भूमिका घेतली. दरम्यान, आता गोरगरीबांच्या कामांवर दलाली खपवून घेतली जाणार नाही. माजलगाव नगरपालिकेत शिस्तीची चाबूक पहायला मिळाली असल्याच्या भावना शहरवासियांकडून व्यक्त होत आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण नगरपालिका प्रशासनात खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगराध्यक्षा महरिन शिफा बिलाल चाऊस यांनी पदभार स्वीकारल्यापासून पालिकेतील कारभार पारदर्शक, लोकाभिमुख व जनतेच्या हिताचा राहावा यासाठी ठोस पावले उचलली आहेत. गोरगरीब नागरिकांची कामे ही कोणतेही पैसे न घेता झालीच पाहिजेत, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. पालिकेतील कामे म्हणजे सेवा असून ती विक्रीस ठेवलेली नाहीत, असा थेट संदेश प्रशासनाला देण्यात आला आहे. या घटनेनंतर पालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका बदलत नागरिकांची कामे तत्काळ आणि अडथळ्याविना करण्यास सुरूवात केल्याचे चित्र आहे. कामासाठी पैशांची मागणी करणाऱ्या प्रवृत्तीला यापुढे थारा दिला जाणार नाही, असा इशारा अप्रत्यक्षपणे देण्यात आला आहे. नगराध्यक्षपतींच्या भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाची भावना असून, प्रशासनावरील विश्वास अधिक बळकट झाला आहे.
नगराध्यक्ष पती बिलाल चाऊस यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत शिस्त, जबाबदारी आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येत आहे. पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनतेशी नम्र वागावे, नियमानुसार काम करावे आणि कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार टाळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या घटनेमुळे माजलगाव नगरपालिकेत ‘पैशाविना काम’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. नगराध्यक्ष पती बिलाल चाऊस यांचे कार्य हे केवळ पदापुरते मर्यादित नसून, जनतेच्या हक्कासाठी उभे राहणारे असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. चांगले काम, कणखर निर्णय आणि गोरगरीब जनतेच्या बाजूने घेतलेली ठाम भूमिका यामुळे नगराध्यक्ष पती बिलाल चाऊस यांना जनतेकडून चांगल्या कामाची पावती मिळत आहे. आगामी काळात माजलगाव नगरपालिका ही भ्रष्टाचारमुक्त, जनतेसाठी कार्य करणारी आणि विश्वासार्ह ठरेल, अशी अपेक्षा शहरवाशिय व्यक्त करत आहेत.
मारहाणीचे आरोप अफवा; मग्रुर कर्मचाऱ्यांना चाप बसायलाच हवा : बिलाल चाऊस
“जनतेने आम्हाला सर्वसामान्य नागरिकांची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे. मात्र काही मग्रुर कर्मचारी सर्वसामान्य जनतेकडून पैसे घेऊन काम करत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा कर्मचाऱ्यांना चाप बसणे अत्यावश्यक आहे. माझ्याकडून कोणत्याही प्रकारची मारहाण झालेली नसून, तसे आरोप केवळ अफवा आहेत,” अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष पती बिलाल चाऊस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
जे केले ते योग्यच; बिलाल चाऊस यांच्या भूमिकेशी सहमत : अमोल सोळंके
“आम्ही जनतेचे सेवक आहोत. एका कर्मचाऱ्याला गेल्या अनेक वेळा गोरगरिब जनतेची कामे करण्याबाबत सांगितले होते. मात्र प्रत्येक वेळी तो पैशांची मागणी करून गोरगरिबांची आर्थिक पिळवणूक करत होता. अशा कर्मचाऱ्यांना धडा शिकवणे गरजेचे आहे. त्यांनी जे केले ते योग्यच केले. बिलाल चाऊस यांच्या भूमिकेशी मी पूर्णपणे सहमत” असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक अमोल सोळंके यांनी दिली.



Comment here