‘ऐपतीचे प्रमाणपत्र’साठी ५० हजारांची मागणी, २० हजारांवर सौदा!
बीड : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी जिल्ह्यात मोठी कारवाई करत परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना ताब्यात घेतले आहे. तक्रारदाराकडे ‘ऐपतीचे प्रमाणपत्र’ देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, महसूल विभागात या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराला आपल्या कामासाठी ऐपतीचे प्रमाणपत्र आवश्यक होते. संबंधित प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सुरुवातीला ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम २० हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. मात्र, व्यवहार ठरल्यानंतर तहसीलदार मुंडे यांना तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांनी प्रत्यक्ष रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. एसीबीकडून पुढील तपास सुरू असून, संबंधित प्रकरणात अधिकाऱ्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, प्रशासनातील पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



Comment here