आपला जिल्हा

धारूर तालुक्यात संतापाची लाट!

तरूणाच्या आत्महत्येनंतर पोलीसांच्या भूमिकेविरोधात मृतदेह ठेवून तीव्र आंदोलन

धारूर : तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीतील कारी गाव परिसरात २० फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास २२ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृतकाच्या नातेवाईकांनी रात्री सुमारे ८ वाजता दिंद्रुड पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून तीव्र आंदोलन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, धर्मराज अर्जुन बडे (रा.गांवदरा, ता.धारूर, जि.बीड) यांनी कारी गावातील एका शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. काही नागरिकांना झाडावर लटकलेला मृतदेह दिसून आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी धारूर ग्रामीण रूग्णालयात पाठवून प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, मृत तरूणाच्या नातेवाईकांनी आरोप केला की संबंधित आरोपींकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याने धर्मराज यांनी टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी त्यांनी पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून आंदोलन छेडले. रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते.

 

“या प्रकरणाची चौकशी सुरू”

मृतदेह दिंद्रुड पोलीस ठाण्यासमोर ठेवून नातेवाईकांनी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आम्ही नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रकरणी सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी दिली.

Comment here